केंद्र शासनाच्या पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत गरजू पथविक्रेत्यांना कर्ज वाटप

अलिबाग : कोविड-19 महामारी व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशातील अनेक लोकांचे लहान-मोठे उद्योग बंद पडले. त्यात रस्त्यांवर दुकान लावून (पथविक्रेते) त्यावर उपजीविका करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा लोकांकरिता केंद्र शासनाने पीएम-स्वनिधी योजना सुरु केली आहे. जेणेकरून पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करून आपले स्वतःचे घर चालविता येईल.

जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावा, असे आवाहन पथविक्रेत्यांना केले आहे. तसेच जिल्हा अग्रणी प्रबंधक श्री.आनंद लिंबेकर यांनी नगरपालिका क्षेत्रातील इच्छुक गरजूंनी आपले कर्ज प्रस्ताव बँकेकडे त्वरित पाठवण्याची विनंती केली असून ही योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यात बँकेमार्फत 35 लोकांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात बँक ऑफ इंडियाचा सर्वात मोठा वाटा आहे. तसेच दि. 15 सप्टेंबर रोजी कर्ज वितरणाचा कार्यक्रम अलिबाग येथील आयडीबीआय बँकेत करण्यात आला. यात जिल्हा अग्रणी प्रबंधक आनंद निंबेकर आणि आयडीबीआय बँकेचे शाखा प्रबंधक सागर वैद्य यांनी पथविक्रेत्यास पाणीपुरी व्यवसायासाठी कर्ज मंजूरीचे पत्र देऊन कर्ज वाटप केले.

या योजनेत ज्यांना नगरपरिषदेने परवाना दिले आहेत, अशा पथविक्रेत्यांना बँकेकडून रुपये दहा हजार पर्यंतचे कर्ज मिळू शकेल. कर्जाची परतफेड बारा महिन्यात समान हप्त्याने करावयाची आहे. जे नियमित परतफेड करतील त्यांना 6 टक्के व्याजाची परतफेड सरकारद्वारे करण्यात येईल.