अलिबाग : केंद्र शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना असून त्यांची अंमलबजावणी करुन जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती श्रीरंग बारणे यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार रविशेठ पाटील, आ.प्रशांत ठाकूर, आ.महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे सदस्य उपस्थित होते.
खा. श्री.बारणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेसाठी केंद्र शासन अंगिकृत असलेल्या अनेक योजना शासन राबवित असून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक मदत कार्य, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), स्वच्छ भारत मिशन अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, डिजिटल इंडिया भूमी अभिलेख कार्यक्रम, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य योजना, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, उज्वल डीस्कोम अशुरन्स योजना, महाराष्ट्र कृषी पंप वीज जोडणी धोरण-2020, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना, शालेय पोषण आहार, जलमार्ग विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, भारत नेट प्रोजेक्ट, पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना त्याचबरोबर रेल्वे, टेलिकॉम, राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रातील विविध विकास कामे अशा विविध योजनांचा लाभ शहरी तसेच ग्रामीण जनतेला मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना यावेळी केले. तसेच ग्रामीण व शहरी भागात योजनांची व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी करावी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन योग्य प्रस्ताव तयार करावेत. योजनांविषयी सूचनांचे फलक प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत, योजनांचे प्रस्ताव कोणकोणत्या स्तरावर प्रलंबित आहेत याची माहिती सादर करावी, जिल्ह्यातील कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जिल्हृयात राबविण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या विविध योजना संदर्भातील आढावा त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाकडून जाणून घेतला.
खा.सुनिल तटकरे म्हणाले की, शासकीय अधिकाऱ्यांनी कोणताही आरखडा तयार करताना गरजा, आवश्यक निधी व उपलब्ध निधी याचा बारकाईने अभ्यास करावा, शासकीय यंत्रणेने पुढाकार घेवून जास्तीत जास्त प्रस्ताव सादर व्हावेत, यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच अनेक शासकीय विभागातील रिक्त पदांविषयी चिंता व्यक्त करताना त्यांनी अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबध्द काम करावे, अशा सूचना दिल्या.
बैठकीचे सूत्रसंचलन स्वच्छता व पाणी पुरवठा विभागचे जिल्हा समन्वयक जयवंत गायकवाड यांनी केले. बैठकीच्या प्रारंभी गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रातील निधन झालेल्या व्यक्तींना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. बैठकीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.