पनवेल : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने नवी मुंबईतील वाशी, कोकणभवन, बेलापूरच्या दिशेने बससेवा अजूनही बंद ठेवल्याने या मार्गावर दररोज मोठय़ा संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होतांना दिसत आहेत. मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामार्फत या मार्गावरील बससेवा सुरू आहे. या बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची दररोज मोठी झुंबड उडते. प्रवाशांचा हा भार इतका मोठा आहे की एनएमएमटीची या मार्गावरील बससेवाही अपुरी ठरू लागली आहे.
व्यवसाया व नोकरीच्या निमित्ताने नवी मुंबईच्या दिशेने कल्याण, डोंबिवली परिसरातून दररोज मोठय़ा संख्येने प्रवासी ये-जा करत असतात. केडीएमटी आणि एनएमएमटी प्रशासनाच्या अहवालानुसार हा आकडा दररोज किमान दोन लाखाच्या घरात आहे. टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर बहुतांशी खासगी, सरकारी कार्यालये सुरू झाली आहेत. नवी मुंबईत कोकण भवन परिसरात शासकीय कार्यालये असून येथेही कर्मचाऱ्यांना उपस्थिती आता बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतून नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.
कल्याण- डोंबिवलीमधील नोकरदार प्रामुख्याने नवी मुंबई, वाशी, बाजार समिती, तुर्भे, महापे, सीबीडी बेलापूर, कोकणभवन परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त जातात. हे सगळे प्रवासी कल्याण- डोंबिवली पालिकेचे करदाते आहेत. त्यांचे प्रवासात होणारे हाल विचारात घेऊन केडीएमटीने तात्काळ कल्याणहून नवी मुंबईकडे बस सोडणे आवश्यक आहे. कडोंमपा हद्दीतील प्रवाशांची वाहतूक करण्याची प्रामुख्याने जबाबदारी ‘केडीएमटी’ची असताना तो भार ‘एनएमएमटी’ वाहत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन विभागाने ही सेवा लवकरात लवकर पूर्ववत करावी अशी मागणी सर्वच स्थरातून होतांना दिसत आहे.