पनवेल (संजय कदम) : सिंधुदुर्ग येथून मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी सहा लाखांचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ‘करण्यात आला आहे.
बोरिवली येथे राहणाऱ्या माधुरी गवस (६०) ह्या मुंबईत त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबईला येत होत्या. यावेळी लग्नात वापरण्यासाठी त्यांनी ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मौल्यवान दागिने सोबत आणले होते.
त्यांची रेल्वे पनवेल स्थानकात पोहोचली असता त्यांना त्यांच्या बॅगची चेन उघडी आढळून आली. यामुळे त्यांनी बॅग तपासली असता, त्यामधील दागिन्यांची पर्स आढळून आली नाही.
याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.