अलिबाग : राज्यामध्ये कोविड-19 रुग्णांमध्ये व करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्यूमध्ये होत असलेली वाढ विचारात घेता. यापुढे कोविड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून करण्यासाठी राज्यभर “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. कराेनाविरोधातील ही लढाई आपण सर्व मिळून सक्षमपणे लढू या, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज केले.
या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव,पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत गृहभेटीद्वारे संशयित कोविड तपासणी व उपचार करणे, अतिजोखमीच्या (co-morbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे, SARI/ ILI रुग्णांच्या भेटीद्वारे सर्वेक्षण करणे, त्यांची कोविड-19 तपासणी आणि उपचार तसेच गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकाला कोविड-19 बाबत आरोग्य शिक्षण देणे, हे या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
या अनुषंगाने दि. 14 सप्टेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन ही मोहीम प्रभावीरित्या राबविण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या. त्या अनुषंगाने दि.14 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी जिल्हास्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ही मोहीम रायगड जिल्ह्यामध्ये दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1 हजार 500 पथके तयार करण्यात आलेली आहेत.
तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी गृहभेटीच्या वेळी येणाऱ्या सर्वेक्षण पथकाला पूर्ण सहकार्य करून त्यांच्या घरातील सदस्यांची आरोग्य विषयक खरी माहिती द्यावी व आपली आरोग्य विषयक तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.