पेण (सुनिल पाटील ) : रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते स्वर्गीय संतोषजी पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले. तसेच कोरोनाने राज्यातील अनेक पत्रकारानां आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे पत्रकारांचे नेते एस.एम.देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री व सर्व संबंधितांना पत्रव्यवहार करून पत्रकारांची अँटीजन टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी पेणच्या पत्रकारांची अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. त्यानुसार पेण मधील 30 च्या वर पत्रकारांची अँटीजन टेस्ट करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते स्वर्गीय संतोषजी पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. असा प्रसंग कोणावर येऊ नये. यामुळे मराठी पत्रकार परिषद च्या सूचनेनुसार पेण प्रेस क्लब व पेण मधील पत्रकारांनी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेऊन घडलेल्या परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. यादरम्यान कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोग्य यंत्रणेला ताबडतोब दूरध्वनी वरून संपर्क साधून, पेण मधील सर्व पत्रकारांची अँटीजन टेस्ट करण्याचे आदेशच दिले. तसेच जे पत्रकार पॉझिटिव्ह येतील यांच्या परिवाराचीही अँटीजन टेस्ट करण्याचे आणि पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदचे कोकण विभाग सचिव विजय मोकल, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, राजेश प्रधान, पत्रकार तथा नगरसेवक संतोष पाटील, कमलेश ठाकूर, राजेश कांबळे, सुनिल पाटील, स्वप्नील पाटील, नरेश पवार, संतोष पाटील, प्रशांत पोतदार, सुदर्शन शेळके, दीपक लोके, प्रकाश माळी, धनाजी घरत, प्रदीप मोकल, गणेश पाटील, विनायक पाटील, सुभाष टेम्बे, किरण बांधनकर आदिंसह उपस्थित होते. डॉ.अभिजित पाटील, डॉ.प्रभाकर सोनावणे, डॉ.विशाल महाजन, डॉ.तेजस्विनी म्हात्रे व दिशा लॅबचे डॉ.गोसावी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी पेणच्या पत्रकारांनी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते स्वर्गीय संतोष पवार यांना श्रद्धांजली वाहिली.