नवी दिल्ली : आजपासून कोरोना काळात संसदेचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु होत आहे. राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज होणार आहे. करोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहे वापरली जाणार आहेत.
संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. करोना काळात होणाऱ्या या संसदेच्या अधिवेशनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यासाठी वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात येत आहे. या अधिवेशनात सरकार एकूण 23 विधेयकं सादर करणार आहे. त्यापैकी 11 हे अध्यादेश आहेत. करोना लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही निर्णय लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते. जसं की करोना वॉरियर्स, डॉक्टर, नर्सेस, आशा वर्कर्स यांच्यावर कुणी हल्ला केल्यास त्याला अधिक कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
अधिवेशनाआधी खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यात लोकसभेचे 5 खासदार आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा आकडा आणखी वाढतो का हे देखील पाहावं लागेल. सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. इतर वादग्रस्त मुद्दयांच्या चर्चेसह महत्वाच्या विधेयकांबाबत हे अधिवेशन कसं फलदायी ठरतं याकडेही लक्ष असेल.