कोरोनाच्या सावटातही आज गौराई विराजमान

पेण :  गणेश चतुर्थीला गणेशोत्सव सुरू होतो आणि पाठोपाठ दोन दिवसांनी माहेरवाशीण म्हणून गौरीचं आगमन होतं. जशी गणपतीची तयारी महिनाभर आधीच सुरू होते, तशीच घरी येणाऱ्या गौरीची तयारी महिना-पंधरा दिवस आधीच महिला सुरू करतात. गौरीसाठी नवीन साड्या आणणे, कायम ठेवल्या जाणाऱ्या मुखवट्यांची रंगरंगोटी करणे, उभ्या गौरी असतील तर त्यांचे स्टॅंड तयार ठेवणे, डेकोरेशनचे साहित्य आणणे अशी तयारी सुरू होते.

संस्कृत शब्दकोशानुसार ‘गौरी’ म्हणजे आठ वर्षांची आणि अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळस, मल्लिका म्हणजे जाईची वेल हेही अर्थ शब्दकोशात दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.

हिंदू शास्त्रात गौरी हे शिवाच्या शक्‍तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उलेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई, असे सांगितले आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपले सौभाग्य रक्षण झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.

महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्‍यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडीला साडीचोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात.

काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एक-दोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडीचोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे.

काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रात आहे. गौरीचा आशीर्वाद मिळून ऐश्‍वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते.

दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा/बेसनाचा लाडू, करंजी, शेव) नैवेद्य दाखवला जातो. दुपारी पुरणपोळी, आंबाडीची भाजी, सोळा भाज्या किंवा सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.

गौरीपूजन हा महाराष्ट्रातील महिलांचा महत्त्वपूर्ण सण असून त्यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसवितात, हा पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात. म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात.