कोरोना असला तरी गणेशोत्सवाचा उत्साह कायम; रायगड जिल्ह्यात 1 लाख गणेशमूर्तींची होणार प्रतिष्ठापना

पेण (संतोष पाटील) : कोरोनाचे संकट असताना देखील गणेशोत्सवावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. कोरोनोची भीती विसरुन कोरोना गेला तेल लावत असे म्हणत गणेशभक्तांनी यावर्षी सुद्धा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पेण तालुक्यासह जिल्ह्यात सर्वञ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या घरोघरी गणेशभक्तांची लगबग पहायला मिळत आहे. घराघरात रंगरंगोटी, आरास करण्याचे काम जोरात सुरु आहे. कोरोना, पाऊस यामुळे गावोगावचे गणपती आधीच टेम्पोतून घरी आणण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारपेठेत खरेदीची झुंबड नसली तरी, लोक सावधपणे आणि सवड मिळेल त्याप्रमाणे खरेदी करत आहेत.

 जिल्ह्यात 1 लाख 526 गणेशमूर्त्यांची प्रतिष्ठापना 

रायगड पोलिसांच्या हद्दीत यावर्षी सार्वजनिक व घरगुती अशा 1 लाख 526 गणेशमूर्त्यांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खाजगी गणेशमुर्त्या 1 हजार 86 ने कमी झाले आहेत तर सार्वजनिक उत्सवात मात्र 10 ने वाढ झाली आहे. मात्र अनेकांनी दिवस कमी केल्याचेही पहायला मिळत आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाला शनिवार दि. 22 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे.  287 सार्वजनिक गणपती तर 1 लाख 239 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

गणेश चतुर्थीला 22 ऑगस्ट रोजी पेण पोलीस ठाणे हद्दीत 14 सार्वजनिक व 5 हजार 715 घरगुती गणपती, वडखळमध्ये 5 हजार 537 घरगुती गणपती तर दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत 2 सार्वजनिक आणि 3 हजार 383 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

 कर्जतमध्ये 25 सार्वजनिक व 5 हजार 501 घरगुती, नेरळमध्ये 6 सार्वजनिक व 3 हजार 422 घरगुती तर माथेरानमध्ये 3 सार्वजनिक आणि 120 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. खालापूरमध्ये 9 सार्वजनिक व 2 हजार 20 घरगुती, खोपोलीमध्ये 37 सार्वजनिक व 3 हजार 78 घरगुती तर रसायनीमध्ये सार्वजनिक 23 व 2 हजार 286 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत.

मुरुडमध्ये सार्वजनिक एकही गणपती नसून, 5 हजार 156 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत 12 सार्वजनिक व 5 हजार 390 घरगुती, अलिबागमध्ये 8 सार्वजनिक व 3 हजार 956 घरगुती, मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत 1 सार्वजनिक व 3 हजार 586 घरगुती तर रेवदंड्यामध्ये 2 सार्वजनिक व 6 हजार 453 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत.

रोहा पोलीस ठाणे हद्दीत 5 सार्वजनिक व 2 हजार 633 घरगुती, नागोठणेत 13 सार्वजनिक व 2 हजार 15 घरगुती गणपती बसविले जाणार आहेत. पालीमध्ये 12 सार्वजनिक व 4 हजार 222 घरगुती, कोलाडमध्ये 9 सार्वजनिक व 2 हजार 286 घरगुती गणपती, माणगाव पोलीस ठाणे हद्दीत 20 सार्वजनिक व 8 हजार 699 घरगुती, गोरेगांवमध्ये 14 सार्वजनिक व 1 हजार 731 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तळामध्ये एकही सार्वजनिक गणपती नसून, 4 हजार 198 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत.

श्रीवर्धनमध्ये 4 सार्वजनिक व 4 हजार 283 घरगुती गणपती, म्हसळ्यात 1 सार्वजनिक व 2 हजार 509 घरगुती, दिघी पोलीस ठाणे हद्दीत 1 सार्वजनिक व 4 हजार 505 घरगुती गणपती बसविले जाणार आहेत. महाड शहरात सार्वजनिक 30 व घरगुती 2 हजार 557, महाड तालुका हद्दीत 8 सार्वजनिक व 1 हजार 963 घरगुती, महाड एमआयडीसी परिसरात 21 सार्वजनिक व 1 हजार 225 घरगुती गणपती तर पोलादपूरमध्ये 7 सार्वजनिक व 1 हजार 810 घरगुती गणपतींची विधीवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे