कोल्हापूर : जिह्यातील पूरस्थिती कायम आहे. गुरुवारी ४३ फुटांची धोकापातळी ओलांडलेल्या पंचगंगा नदीची पातळी शुक्रवारी दु. १ वाजण्याच्या सुमारास ४४.९ फुटांवर पोहोचली होती. पंचगंगेसह सर्व नद्या-नाल्यांना पूर आला असून, नागरी वस्त्यांसह शेतशिवारातही पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे या भागातून नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दरम्यान, ऐतिहासिक राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून, अलमट्टी धरणातील विसर्ग १ लाख५० हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला आहे.
नृसिंहवाडी दत्तमंदिराच्या छताला पाणी
तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरच्या छताला पुराचे पाणी लागले असून, आज रात्री मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तालुक्यात एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत.
चार हजारांवर नागरिक, एक हजार जनावरांचे स्थलांतर
करवीर, गडहिंग्लज, पन्हाळा, गगनबावडा, चंदगड, आजरा या तालुक्यांतील २३ गावांतील १ हजार ७५० कुटुंबांतील ४ हजार ४१३ व्यक्ती आणि १ हजार १०० जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. तसेच, कोल्हापूर शहरातील ७४ नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरित केले.