खडतर संघर्षाची आव्हाने झेलत अखेर माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार

matheran-e-rikshaw
माथेरान (मुकुंद रांजाणे) : मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या ई रिक्षाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला असून आजवर अनेक खडतर आव्हाने पेलून अखेरीस माथेरान मध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धावण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळेच आबालवृद्ध पर्यटक, शालेय विद्यार्थी,दिव्यांग, रुग्णांसोबतच स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
माथेरानचा शोध सन १८५० मध्ये ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी लावला होता तेव्हापासून ते आजतागायत याठिकाणी मानवचलीत हातरीक्षा आणि घोडा हीच प्रमुख वाहने उपलब्ध आहेत परंतु धावत्या युगाप्रमाणे इथेही व्यवसायात बदल होणे आवश्यक आहे माथेरान हे प्रदूषण मुक्त पर्यटनस्थळ असल्याने इथे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी बॅटरी वर चालणारी ई रिक्षा हाच एकमेव पर्याय सर्वाना उपलब्ध होऊ शकतो ही बाब ओळखून येथील सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त शिक्षक सुनील शिंदेंनी दहा वर्षांपासून  आपल्या परीने, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वेळप्रसंगी पदरमोड करून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यास संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, अनिल नाईकडे , रुपेश गायकवाड,गणपत रांजाणे, संतोष शिंदे यांनी मोलाची साथ दिली. सुनील शिंदेंना हेही माहीत होते की, राज्य सरकारने जरी या रिक्षाला मान्यता दिली तरीसुद्धा इथले काही राजकीय महत्वाकांक्षी लोक पुढील काळात नक्कीच या सुंदर प्रकल्पात खोडा घालून ठरावीक मतांच्या लालसेपोटी होणाऱ्या महत्वपूर्ण कामात अडथळा निर्माण करू शकतात त्यासाठी हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले आहे.
त्यामुळे ज्यांना कुणालाही या पर्यायी वाहतुकीबद्दल आपले म्हणणे, अथवा आडकाठी आणावयाची असेल त्यांना सुप्रीम कोर्टाचेच दरवाजे ठोठावे लागणार आहेत. याकामी सुप्रीम कोर्टाने सुध्दा इथल्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या तीन महिन्यांसाठी इथे प्रायोगिक तत्वावर सध्या सात ई-रिक्षा सुरू करणार आहेत. या नवीन बदलाचे जवळपास सर्वसमावेशक सुशिक्षित, अभ्यासू  नागरीकांनी स्वागतच केले असून त्यास संमती दर्शवली आहे.शासनाच्या मान्यतेने शालेय विद्यार्थ्यांना पाच रुपये या अत्यंत माफक दरात चार किलोमीटर दुर असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायला मिळणार आहे.तर नागरिकांना प्रति प्रवासी ३५ रुपये इतका दर आकारण्यात येणार आहे.
कोणत्याही क्षेत्रात काळानुरूप बदल घडवून आणले नाहीत तर सध्याच्या या धावत्या युगात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग साध्य करताना यशापासून खूपच पिछेहाट होण्याची शक्यता असते त्यासाठी युगाप्रमाणे स्वतः मध्ये आणि सर्वतोपरी व्यावसायिक दृष्टीने परिवर्तन घडले तरच नव्या क्रांतीच्या दिशेने मार्गक्रमण होत असते यात शंकाच नाही. जग एकविसाव्या शतकात वाटचाल करीत असताना त्यातच खेडोपाडी सुध्दा शहराचे अनुकरण करून आदिवासी वाड्या असोत की अतिदुर्गम भाग असो ही गावे सुध्दा आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात समृद्धीच्या दिशेने जात आहेत.
परंतु माथेरान हेच एकमेव गाव असे आहे की याठिकाणी आजही जुन्या रूढींना आणि परंपरांना जपून इथला स्थानिक नागरिक मागासलेपणाचे जीवन जगत आहेत.एखाद्या खेडेगावात सुध्दा सुंदर रस्ते असल्याने त्याठिकाणी उत्तम प्रकारे वाहतुकीची व्यवस्था निर्माण झाल्याने तिथे विकासाची गंगा वाहत आहे.
—————————–
श्रमिकांच्या मागणीची दखल राज्य सरकार ने घेतली असून ई रिक्षामुळे पर्यटक व स्थानिकांना स्वस्तातील वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी , दिव्यांग  व महिलांची पायपीट वाचेल.
—–शकील पटेल, अध्यक्ष श्रमिक रिक्षा संघटना माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *