“पप्पा, माझा उद्या बड्डे आहे.. मला काय गिफ्ट देणार?”
अवघ्या पाच वर्षांची चिमुकली पिंकी तिच्या पप्पांना विचारत होती.
“काय बरं गिफ्ट हवं माझ्या पिंकूला?” पिंकीला मांडी वर बसवत तिच्या पप्पांनी विचारलं..
“पप्पा.. मला ना.. खूप सारे टॉयज हवे.. मला टेडी बेअर हवं.. मोट्ठा केक हवा.. परी सारखा फ्रॉक हवा.. मला… मला खुप सारे चॉकलेट हवे.. आणि खुप सारे गेम्स हवे…”
“अरे बापरे…! एवढं सगळं हवं तुला???”
“अजुन खुप काही हवंय पप्पा..”
“पण तू एवढ्या सगळ्या गेम्स, टॉयज आणि ड्रेसेसचं करणार काय?”
“वापरणार!” पिंकीने झटकन उत्तर दिलं…
“पिंका… ह्या वेळी आपण जरा वेगळ्या पद्धतीने तुझा बड्डे सेलिब्रेट करूया का?” पप्पांनी विचारलं..
“म्हणजे काय करायचं?” गोंधळलेल्या पिंकीचा प्रतिसाद..
“म्हणजे बघ हं.. तू आत्ता एवढी लहान आहेस.. आणि तुझ्या मागण्या बघ बरं कित्ती आहेत.. हो कि नाही?”
“हो.”
“आणि तुला वर्षभर तू म्हणशील ते खेळणं, म्हणशील ते कपडे मम्मा आणि मी घेऊन देतो.. हो ना?
“हो.”
“तरी पण.. वर्षातुन एकदा येणाऱ्या तुझ्या बड्डेला केवढी मोट्ठी ही लिस्ट…! आता जरा विचार कर.. तुझ्या स्कूल मध्ये, आपल्या सोसायटी मध्ये, तुझ्या आजुबाजुला अशी कित्ती तरी मुलं, मुली असतील.. ज्यांना वर्षभर गिफ्ट आणि खेळणी तर सोड.. घालायला चांगले कपडे सुद्धा मिळत नाहीत.. हो ना? तू पाहिले आहेत ना?”
“हो..”
“मग ह्यावेळी.. तुझ्या बड्डे ला तुझ्या सोबत ह्या सगळ्यांना पण जर गिफ्ट दिले.. तर ते किती हैप्पी होतील? हो ना?”
“हो..”
“मग ह्यावेळी आपण अशा मुलांना कपडे, खेळणी, पुस्तकं असे गिफ्ट दिले.. तर सगळे किती खुश होतील…तुझ्या बड्डेला तू कित्ती जणांना आनंद देशील..!
कित्ती जणांची गरज पूर्ण होईल..! आवडेल तुला असा बड्डे सेलिब्रेट करायला?”
” हो पप्पा.. मला माझे नवीन फ्रेंड्स पण मिळतील..”
“आणि फ्रेंड्स बरोबर बड्डे आणखी हैप्पी होईल..! “
“मी माझ्या बाकी फ्रेंड्सना पण हे सांगून येते पप्पा..” असं म्हणता म्हणताच पिंकी फ्रेंड्सना सांगायला धावत निघुन गेली…
घटना तशी छोटीशीच.. पण विचार किती मोठा…!
लहान वयातच दुसऱ्यांना मदत करायची, दुसऱ्यांसाठी काही करायची भावना पिंकीच्या पप्पांनी तिच्या मनात रुजू केली.. खरा आनंद फक्त स्वतः साठी जगण्यात नसून तो इतरां सोबत वाटण्यात आहे.. हे त्यांनी तिला शिकवलं…
आपणही.. किमान वर्षातुन एकदा.. ज्यांना आई वडील नाहीत अशा अनाथ किंवा गरीब मुलांसाठी किंवा ज्यांची मुले त्यांना सोडून गेली.. अशा वृद्धांसाठी काही तरी करावे.. त्यांचे प्रेम आणि आशिर्वाद सोबत असतील ना.. तर जे दिले आहे.. त्याच्या दसपट निसर्ग आपल्याला देतो.. आणि हाच निसर्गाचा नियम आहे…
त्यामुळे खऱ्या प्रेमाने आणि आपुलकीने दुसऱ्यांना जो आनंद द्याल तो च निसर्ग सगळ्या बाजूंनी आपल्याला परत करतो..
म्हणून किमान वर्षातुन एक दिवस.. अशा सर्वांचा विचार नक्की करावा.. आणि तो विचार अमलात ही आणावा.!
के. एस. अनु