पेण : पेण हे गणेशमूर्तीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, पण यंदा करोनाचा फटका मात्र या उद्योगाला बसला असला तरी गणेशोत्सवाच्या तोंडावर आतापर्यंत सुमारे २१ लाख गणेशाच्या मूर्ती पेणमधून देशाच्या विविध भागांमध्ये रवाना झाल्या आहेत. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्टय़ आहे. पेणमध्ये गणपती बनवणारे ५०० लहान-मोठय़ा कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी साधारणपणे ३० ते ३५ लाख गणेशमुर्ती बनवल्या जातात. यातून जवळपास ६० ते ७० कोटींची उलाढाल होत असते.
पेण मध्ये दरवर्षी गणेशमूर्तीच्या किमतींमध्ये साधारणपणे १५ ते २० टक्क्यांची वाढ होत असते. या वर्षी ही वाढ २० ते २५ टक्क्यांपर्यंत असेल. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने गुजरात, केरळ आणि राजस्थानमधू येतो. लौकडाऊन यामुळे गणेशमूर्तिकारांचा व्यवसाय जवळपास दीड महिना बंद होते. कारागिरांची कमतरता यंदा जास्त जाणवली. याचा परिणाम गणेशमूर्तीच्या किमतीवर झाला आहे.
पेणमध्ये गणेशमूर्ती घडविण्याचे काम वर्षभर सुरू असते. करोना संकटामुळे जून महिन्यात सरकारने उंचीचे निर्बंध लागू केले. तोपर्यंत मूर्ती तयार झाल्या होत्या. त्यामुळे दोन फूट ते दहा फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये पडून आहेत. यात काथ्या, प्लास्टर ऑफ पॅरीस, शाडूची माती, रंग यासा केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तीवरील घातलेली बंदी या वर्षीपुरती उठवली आहे. त्यामुळे गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र बाजारात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तीपेक्षा यंदा शाडूच्या गणेशमूर्तीना जास्त मागणी होत आहे.
पेणमधून परदेशात जाणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या घटली आहे. पेणमधून दरवर्षी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया, मॉरिशस आणि दुबई येथे गणेशमूर्ती मोठय़ा संख्येने पाठविल्या जातात. मात्र करोनाच्या साथीमुळे या देशातून होणारी गणेशमूर्तीची मागणी घटली. त्यामुळे १५ ते २० हजार गणेशमूर्तीच परदेशात पाठविण्यात आल्या.