गणेशोत्सव : मुंबई-गोवा महामार्गावर ‘सीसीटीव्ही’चा वॉच, पोलीस बंदोबस्त तैनात

अलिबाग : गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून महामार्गावर योग्य ती खबरदारी घेतली आहे. महार्गावर 16 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच सुमारे 250 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच इतरही तातडीच्या सेवा उपलब्ध करण्यात आल्या अहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे 145 किलोमीटरच्या मार्गावर 217 पोलीस कर्मचारी आणि 25 अधिकारी तैनात केले आहेत. तसेच मार्गावरील 16 ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत. खारपाडा, हमरापूर, पेण, वडखळसह प्रमुख ठिकाणी पोलीस चौक्यांसह, अ‍ॅम्ब्युलन्स आणि क्रेनची व्यवस्था केली आहे.

महत्त्वाच्या बाजारपेठांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलाने पेण तालुक्यातील पेण – खोपोली बायपास 4, रामवाडी चौकी 3, वडखळ 3 असे पेण तालुक्यात
10, माणगाव तालुक्यातील इंदापूर स्टॅण्डवर 1, महाड शहरातील नातेखिंड मदत केंद्रात 3, विसावा हॉटेल परिसरात 1, पाली येथे 4 असे एकूण 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तसेच गणेशोत्वाच्या काळात होम गार्ड आणि राज्य राखीव दलाची मदतही घेतली जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात 287 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून 1 लाख 239 खासगी गणपती आहेत. 13 हजार 372 ठिकाणी गौरींची स्थापना होते.