“सानिका ss… अगं ठेव गं तो फोन.. बघ तरी मावशी काय म्हणतेय…!” माझी मैत्रीण मधुरा तिच्या सात वर्षांच्या चिमुकलीला विडिओ कॉल वर येण्यासाठी मनवत होती.. पण ती चिमुकली हातातला मोबाईल सोडून यायला तयारच नव्हती…
“शीट यार मम्मा.. तुझ्या मुळे किती डिस्टर्ब होतं गेम खेळताना.. आता मेले ना मी..!” अशी बडबड करत ते छोटंसं पिल्लू बेडरूमच्या दिशेनी निघुन गेलं..
खरं तर मुलांच्या हातात मोबाईल देऊन सुरुवातीला आई वडिलांना वाटतं की जरा वेळ तरी शांत बसेल… पण नंतर तोच मोबाईल जेव्हा त्यांच्या हाताला चिकटतो.. तेव्हा हेच आई वडील वैतागतात…
परवा माझी एक मैत्रीण सांगत होती.. “आमच्यात नीट बोलणंच होत नाही… आधी ऑफिस मधुन दमुन यायचा म्हणून.. आणि आता लॉकडाऊन आहे.. वर्क फ्रॉम होम आहे.. म्हणून… काही ना काही कारणाने तो फक्त मोबाईल आणि लॅपटॉप ह्यातच गुंतलेला असतो.. तसं बघायला गेलं तर आमचं लव मॅरेज… पण लग्नाला पाच वर्ष सुद्धा नाही झाली.. आणि आमच्यातलं बोलणंच संपलं!!! आता मी ही प्रयत्न करत नाही.. दोघे ही समोरा समोर बसलेलो असतो.. पण तो त्याच्या मोबाईल मधे आणि मी माझ्या मोबाईल मधे!!! काय बोलणार? बोलायलाच सूचत नाही…!”
तिला तेव्हा तेवढ्यापुरता धीर तर दिला… पण हे विषय काही डोक्यातुन जात नव्हते..
प्रश्न एकच होता… लव मॅरेज .. लग्नाच्या आधी.. ही च आमची मैत्रीण आम्हाला सोडून दोन दोन तीन तीन तास तिच्या भावी नवरोबाशी फोन वर बोलत बसायची.. कित्येकदा तर आम्ही तिची वाट बघतोय हे विसरून ही जायची.. कितीही बोलले तरी ह्यांचे विषय कधीच संपत नव्हते.. मग आता असं काय झालं?
लहानपणी नागरिक शास्त्रात म्हणजे आज काल च्या सेमी इंग्लिश मधल्या मुलांचे सीवीक्स… त्यात शिकवलं होतं… माणुस हा समुहात राहणारा प्राणी आहे.. तो टोळी बनवून शिकार करतो.. वगैरे वगैरे… पण ह्या सोशल नेटवर्किंग च्या जाळ्यानी माणसाचे रिअल सोशल लाईफच हरवून बसले आहे..
एक दोन पिढ्यां पूर्वी घरात आज्जी आजोबा हे प्राणी असायचे.. जे नातवंडांना छान छान गोष्टी सांगायचे.. कविता शिकवायचे.. देवाची स्तोत्र, पाढे शिकवायचे… घरात मोठ्यांचा आदर आणि धाक होता… बाहेरचे खेळ खेळायची एक ठराविक वेळ होती.. काळोख झाला की प्रत्येक पाखराला आपापल्या घरट्यात परतावं लागायचं…
पण पैसा आणि इतर अनेक गोष्टींमुळे घराचं घरपण हरवायला लागलं.. आता त्या चिमुकल्या पाखरांना शिकवायला आज्जी आजोबा नसतात.. ह्याला अजुन ही काही अपवाद नक्कीच आहेत.. पण मम्मी पप्पा दोघे कामात असतात.. मग त्यांना सोबत कोण??? अशा वेळी त्यांना सोबत मिळते मोबाईल ची… !
पण प्रश्न फक्त चिमुकल्यांचा नाही बरं का… प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांचा आहे…
जेव्हा पासून गूगल बाबा, यूट्यूब माता, जोडिला कैंडी क्रश ताई, टेम्पल रन दादा आणि पब जी सारखे मित्र असल्या मुळे माणसाला माणसाची गरजच उरली नाही…
पूर्वी नवीन नवीन रेसिपी शिकायला आई, आज्जी, मावशी, मैत्रीणि असायच्या.. आता ह्या सगळ्यांची आठवण सुद्धा येत नाही.. यूट्यूब वर काहीही शिकता येतं… बोलायला कोणी नसेल तर एकट्यात पिक्चर बघता येतात.. पण ह्या सगळ्याने माणसाची भावनिक गरज नाही भागत…
उदास बसलेल्या मित्रांना एक मीठीच खुप असते खुश करायला.. किंवा रुसलेल्या बायकोला प्रेमाने बनवून दिलेला एक कप चहाही पूरे होतो मनवायला.. मुलांशी किमान अर्धा तास जरी गप्पा मारल्या, घरात गेम्स खेळलो.. तरी आयुष्य इतकं आनंदी होईल.. की आपल्याला त्या मोबाईल च्या सोबतीची गरजच पडणार नाही..!
आपल्या माणसांकडे दिलेलं थोडंसं लक्ष देखील त्यांना आणि आपल्याला मानसिकरित्या खुप मजबूत बनवू शकतं.. माणसाला अजुन ही माणसाचीच गरज आहे… कधी बाप म्हणून, कधी आई म्हणून.. कधी नवरा – बायको.. बहीण – भाऊ.. कधी पक्के मित्र म्हणून… माणसाला एकमेकांशी संवाद साधायलाच हवा.. तरच आपण एक सक्सेसफुल आयुष्य जगु शकु…
- के. एस. अनु