कोलाड (श्याम लोखंडे ) : मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. या कोरोनाने आज तगायत बरेच बळी घेतले. अद्यापही घेत आहे. गणपती उत्सव कालापासून सर्वत्र कोरोना नाही असे वाटून गाफील राहू नये या कोरोनावर नियंत्रण ठेवून त्याला हद्दपार करण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचे खासदार मा. सुनिलजी तटकरे यांनी सुतारवाडी येथे त्यांच्या कार्यालयात दिनांक 5 सप्टेंबर रोजी तातडीची बैठक घेतली.
या बैठकीस पालकमंत्री आदितीताई तटकरे,आ अनिकेत तटकरे, रोहा प्रांत श्री यशवंत माने, श्रीवर्धन चे प्रांत श्री अमित शेडगे, तळा तहसीलदार श्री कानशेट्टी , माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, जिल्हा शल्क चिकित्सक श्री सुहास माने, रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय ससाने तसेच अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता. या बैठकीस खासदार सुनिल तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्याच्या आरोग्याबाबत आढावा घेतला. खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले की जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन असणे आवश्यक आहे. या ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्ण दगावल्याचे ऐकावयास मिळत आहे. यापुढे अशा गोष्टी घडू नये यासाठी विविध उपाय योजना तातडीने केल्या पाहिजेत असे खा सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना ऍटीजन किट्स आवश्यक आहे. हे नसेल तर पॉझिटिव्ह संख्या अधिक वाढेल. अलिबाग सारख्या ठिकाणी दररोज 100 पॉझिटिव्ह रुग्ण सापडणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल. रुग्णांनी टेस्ट करण्यासाठी उशीरा जावू नये, आपला आजार लपवून ठेवलास तो आजार विकोपाला जावून मृत्यु येतो. असे घडू नये यासाठी लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार करण्यास जावे. रोहा, माणगाव, श्रीवर्धन तसेच अन्य ठिकाणच्या कोविड सेंटर मध्ये जास्तीत जास्त बेडची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाला, असे होता कामा नाही. जे काही रुग्ण येतात त्यांना 60 ते 70 टक्के ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे प्रत्येक कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन असणे आवश्यक असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले. खासदार सुनिल तटकरे पुढे म्हणाले की रायगड जिल्ह्यात दररोज पाच ते सहा हजार कोरोनाचे रुग्ण आढळतात ते बरे होईपर्यंत त्यांची जबाबदारी घेणे आवश्यक असून ज्या सेंटरमधून रुग्णांना भोजन दिले जाते ते भोजन चांगल्या प्रकारचे असावे याबद्दल कुठूनही तक्रार येता कामा नये. कोणताही रुग्ण हा तिथे मिळाणाऱ्या सुविधांपासून वंचित राहता कामा नये. ज्या ठिकाणी बेड कमी आहेत अशा ठिकाणी बेड आणि ऑक्सिजनची संख्या वाढविण्याची व्यवस्था करा. किल्ला येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या भोजनाची चांगल्या प्रकारे व्यवस्था होत असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. खासदार सुनिलजी तटकरे यांनी जनतेची काळजी घेताना सांगितले की आज सर्वच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत,
सर्वत्र बाजारपेठा उघडल्या आहेत. अनेकांची वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड असते. अशावेळी मासळी, मटण विक्री दुकानदारांची टेस्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सर्व वस्तू खरेदी करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुकादारांशी वेळोवेळी संबंध येत असल्यामुळे प्रत्येकाची टेस्ट झालीच पाहिजे.ज्या ज्या ठिकाणी कोविड सेंटर आहेत. तेथील भोजन व्यवस्थेबद्दल कोणाचीही तक्रार येईल असे करू नये. प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक असताना काही अधिकारीच मास्क लावत नाहीत. अशी शिकलेली माणसं जर मास्क लावत नसतील तर इतरांचे काय असा गंभीर प्रश्न खासदार सुनिल तटकरे यांनी मांडला. रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना आपल्या घरापर्यंत सुखरूप पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था झाली पाहिजे.
सुतारवाडी आणि विरझोली या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मी मंजूरी आणून दिली होती त्यांचे काय झाले. असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय ससाणे यांनी सांगितले की या दोन्ही ठिकाणी जागेचा प्रश्न सुटला आहे. काही गोष्टींचा कमतरता असल्यामुळे काम सुरू नाही. तेव्हा खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले की ज्या गोष्टीची अडचण असेल त्या गोष्टी मी सोडुन देईन पण लवकरात लवकर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहीले पाहिजे. 3 जून ला निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. त्यांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळाली. परंतु अद्यापही काही जण वंचित आहेत. त्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित रक्कम जमा करण्याचे आदेश सुनिल तटकरे यांनी संबंधितांना दिले. यावेळी उपस्थितांना आपले म्हणणे मांडताना सांगितले कि सहा महिन्यात 108 च्या ॲम्बुलन्स वापर झालेला नाही. गरजेच्या वेळी कधीच ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही.
महाड मध्ये तर फोन केल्यानंतर 4 तासांनी ॲम्बुलन्स उपलब्ध होते. त्यामुळे 108 चा काहीच उपयोग होत नाही. खासगी डॉक्टरांना मदतीसाठी आम्ही बोलवले तर त्यांना तीन तीन महिन्याचे पगार केले गेले नाहीत. ॲम्बुलन्स वेळेत आली असे कधी झाले नाही. रुग्ण जरी आवाक्याबाहेर गेलेला आढळला तर त्यास पनवेल किंवा अलिबाग येथे न्यावे लागते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्यामुळे रुग्णाला तेथ पर्यंत पोहचायला वेळ लागतो. मात्र रुग्णाला नेताना गाडीचा सायरन जो असतो तो बंद करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या आवाजामुळे रुग्णांमधील धडधड अधिक वाढून मनात मोठी भीती निर्माण होते. पुणे येथे रुग्णाला नेताना मध्येच थांबवले जाते तेथून दुसरी रुग्णवाहिका दिली जाते. अशी परवड थांबवावी. खासदार सुनिल तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यथा ऐकून त्या बाबत संबंधितांना त्वरित सुधारणा करण्याचे आदेश दिले. तुम्ही मात्र या कोरोना काळात जास्तीत जास्त रुग्णांची सेवा करून कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन खासदार सुनिल तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे व आ अनिकेत तटकरे यांनी केले.