पनवेल (संजय कदम) : क्वाईन झेड एक्स या कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक मिळेल, असे आमिष दाखवून एका टोळीने पनवेलसह मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील शेकडो लोकांकडून लाखो रुपये स्वीकारल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या कंपनीला व त्यांच्या गुंतवणुकीच्या स्किमला भारत सरकार व आरबीआय अथवा इतर सरकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी नसताना त्यांनी बेकायदा गुंतवणुकीची स्किम सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह अपहार करणे, तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये सनी पगारे, देवेंद्र विश्वकर्मा, गुलशन वर्मा व इतरांचा समावेश असून या टोळीने गत ऑगस्ट महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार घेऊन क्वाईन झेड एक्स या कंपनीच्या स्किमची जाहिरात केली होती. तसेच कंपनीच्या ट्रस्ट वॉलेट या अँपच्या माध्यमातून त्यांच्या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला कंपनीच्या वतीने कमी कालावधीत मोठ्या स्वरूपात आर्थिक लाभ होईल, असे आमिष दाखविले होते.
या आमिषाला बळी पडून शेकडो लोकांनी लाखो रुपये गुंतविले होते. त्यांच्यापैकीच कांदिवली चारकोप येथे राहणारा मोहम्मद आरिफ यानेही सदर स्किममध्ये ४ लाख ५६ हजार रुपये गुंतवले होते. मोहम्मदने केलेल्या गुंतवणुकीपोटी त्याला ४० डॉलर मिळतात असे दाखविण्यात आले होते.
मात्र ही रक्कम त्याला वापरता येत नव्हती, तसेच ती रक्कम त्याला भारतीय चलनामध्ये कन्वर्ट करता येत नव्हते. तसेच त्या रकमेतून त्याला कोणत्याही प्रकारची खरेदी देखील करता येत नव्हती. त्यामुळे मोहम्मदने आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली होती. मात्र या टोळीकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. गुंतवणुकीची स्किम ही फसवी असल्याचे लक्षात येताच त्याने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.