नवीमुंबई : नवी मुंबई मेट्रोच्या ‘बेलापूर-पेंधर’ मेट्रो प्रकल्पाचा तळोजा एमआयडीसीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय सिडको व एमआयडीसी या दोन महामंडळांनी घेतला आहे. सुमारे पावणेचार किलोमीटर लांबीचा हा मेट्रो प्रकल्प पुढे वाढविण्यात येणार असून या मेट्रो जाणाऱ्या रस्त्यावरील प्रकल्पाच्या मातीचे परीक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरच कामाचे निविदा प्रक्रिया पार पडणार आहे.
तळोजा एमआयडीसीतील कामगारांना तसेच उद्योजकांना सुखकर प्रवास व्हावा, यासाठी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी सिडकोकडे नवी मुंबई मेट्रो तळोजा औद्योगिक क्षेत्रापर्यंत नेण्याची मागणी केली होती व यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून अखेर एमआयडीसी आणि सिडकोने बेलापूर-पेंधर प्रकल्पाबरोबरच पावनेचार किलोमीटर मेट्रोचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार तळोजा एमआयडीसी परिसरात मेट्रोच्या रस्त्यावरील प्रकल्पाची माती परीक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. यानंतर लवकरच कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, बेलापूर ते तळोजा एमआयडीसीपर्यंत सुरु होणारी ही इंडस्ट्रीज आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वरदान ठरेल. तसेच हे मेट्रो स्थानक लवकरात-लवकर सुरु होईल असा विश्वास तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.