नेरळ : नेरळ-माथेरान टॅक्सी सेवेने प्रवासी वाहतूक आज 4 सप्टेंबर पासून सुरू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 17 मार्च पासून माथेरान हे पर्यटन स्थळ बंद केले होते. 17 मार्च पासून नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर पर्यटक वाहतूक बंद होती. त्या दिवसापासून पर्यटन व्यवसायाबरोबर टॅक्सी व्यवसाय 100 टक्के ठप्प होता.
माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर 3सप्टेंबर रोजी नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वांना व्यवसाय मिळाला पाहिजे यासाठी नंबर प्रमाणे टॅक्सी सुरू करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. एकाच वेळी माथेरान दस्तुरी नाका आणि नेरळ येथील प्रवासी वाहतूक सुरू करण्यावर एकमत झाले. मागील तीन दिवसात जेमतेम पर्यटक माथेरान ला पोहचले असून विकेंडला तरी पर्यटकांचा ओघ वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.