पेण (राजेश प्रधान) : राज्यातील गुरव समाजातील युवकांसाठी ओबीसी महामंडळाच्या धर्तीवर संत काशीबा युवा विकास योजना सुरू करून त्यास ५० कोटींचे भाग भांडवल देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर येथे झालेल्या गुरव समाज महासंघाच्या महाअधिवेशनात केली.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताने, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार यशवंत माने, आमदार शहाजी बापू पाटील तसेच गुरव समाजाच्या महाअधिवेशनाचे संयोजक माजी आमदार विजयराज शिंदे, सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे महत्वाचे पदाधिकारी आणि राज्यातील तसेच देशातील गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ८० हजार पेक्षा जास्त गुरव बांधव या महाअधिवेशनात एकत्रित आले होते.
गुरव समाजातील युवकांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या संत काशिबा युवा विकास योजनेअंतर्गत ५० कोटींचे भाग भांडवल देऊन आपले सरकार थांबणार नसून गरज पडेल तसे भाग भांडवल वाढवण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व समाज घटकांचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून, गुरव समाजाच्या इतर मागण्या संदर्भातही शासन सकारात्मक विचार करेल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
सरकार स्थापन झाल्यापासून अनेक लोकहिताचे निर्णय या सरकारने घेतले मात्र यावर विरोधकांकडून नेहमी टीका होत असते. अशा टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ. टीका करणाऱ्यांची स्पर्धा लागली असली तरी त्याची आम्ही परवा करत नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या महाअधिवेशन प्रसंगी शिवबिल्व व या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
दुधातील साखर म्हणजे गुरव समाज बांधव
गुरव समाज हा एक फार मोठी परंपरा असलेला समाज आहे. समाजाने खऱ्या अर्थानं देव-देश आणि धर्मा करता सर्वस्व अर्पण केलं आणि देव – देश धर्माची सेवा करत वर्षानुवर्ष या ठिकाणी हिंदू धर्माला जीवित ठेवण्याचे काम या गुरव समाजाने केल. गाव तिथे मंदिर, गाव तिथे गुरव. जिथे मंदिर तिथे गुरव समाज आज आम्हाला पाहायला मिळतो. गावागावात गुरव समाज अल्पसंख्यांक असला तरी तो दुधातील साखरेप्रमाणे आहे. गुरव समाजाचे समाज बांधव हे शिवशंकरासारखे साधे भोळे आहेत. गुरव समाजाच्या समाजाच्या मागण्या संदर्भात राज्य शासन सकारात्मक असून समाजाच्या मागण्या सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गुरव समाजाच्या महत्त्वाच्या मागण्या
1950 च्या तेंडुलकर आयोगाच्या इनामी वर्ग तीनच्या जमिनीत संदर्भात गुरव समाजाला न्याय देण्यात यावा, सार्थीच्या धर्तीवर समाजातील युवकांसाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे, समाजाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करावा, जिल्हा स्तरावर विद्यार्थी वस्तीगृहासाठी राज्य शासनाने नाममात्र किमतीत समाजाला जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी याप्रसंगी मांडल्या.