कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील गेले तीन वर्ष ररवडलेल्या खांडपे-सांडशी रस्त्याचे काम हे ठेकेदाराने अर्धवट स्वरूपात केले असल्यामुळे या अर्धवट कामाचा फटका हा ग्रामस्थांना बसत असून, या रस्त्यावरून प्रवास करणे ग्रामस्थांना जिकरीचे झाले आहे. गेल्या तीन वर्षात रस्त्याचे काम होत नसल्याने अखेर ग्रामस्थांचा उद्रेक झाला असल्याने, सन २०२३ या नविन वर्षाच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहे.
येत्या पंधरा दिवसात कामे पूर्ण करावीत अशी मागणी ही रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली आहे. अन्यथा सात जानेवारीला ग्रामस्थांसह कर्जत तहसिलदार यांच्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा इशारा सुधाकर घारे यांनी दिला आहे.
रवांडपे -सांडशी या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली होती. सुमारे दहा कोटी रुपये कामांच्या निविदा नोव्हेंबर २०२० मध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१९-२० या वित्तीय वर्षात बॅच २ अंतर्गत रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ११ जून २०१९ मध्ये तालुक्यातील ५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या खांडपे ते सांडशी रस्त्याचे काम देखील यात मंजूर करण्यात आले होते.
याकामासाठी २ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली होती. यानंतर कामांची निविदा होऊन दिनांक ४ जानेवारी २०२१ मध्ये सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीने हा ठेका मिळवला होता. त्यासाठी त्यांनी १२ टक्के खालच्या दराने हा ठेका भरला होता. मात्र कार्यरंभ आदेश मिळून देखील काम काही कंपनीने धड केले नाही. ४ किमी ३०० मीटरच्या एकूण रस्त्यांपैकी केवळ ५०० मीटरचे काम केवळ करण्यात आले असून उर्वरित रस्ता खोदून ठेवुन मात्र ठेकेदार हा फिरकला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मुळगाव, तीवणे, माणगाव तर्फे वासरे, सांडशी येथील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तर ठेकेदाराने केलेल्या कामापैकी मोऱ्या काहीच दिवसात खचल्या आहेत. तर २०२० मध्ये मंजूर असलेले या रस्त्याचे काम अद्याप होत नसल्याने अखेर ग्रामस्थांच्या संयमाचा बांध आज अखेर फुटला आहे. सन २०२३ या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. तर रस्ता होण्यास अडचण तरी काय ग्रामस्थ शांत आहेत त्यांचा अंत पाहिला जातोय का ? कि सरकार व प्रशासनाला या ग्रामस्थांशी काही देणे घेणे नाही अशी भूमिका आहे का? असे प्रश्न सुधाकर घारे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच ठेकेदाराने १२ टक्के कमी दराने निविदा भरली त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
मात्र आम्हाला ग्राम सडक योजनेच्या निकषांनीच हा रस्ता हवा आहे. तेव्हा येत्या १५ दिवसात या रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण करावे अन्यथा ७ जानेवारी रोजी या भागातील ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला बसू असा इशारा देखील सुधाकर घारे यांनी दिला आहे. त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर देखील ठेकेदार व संबंधित शासकीय यंत्रणेला जाग येणार का? कि ग्रामस्थांचा आणखी अंत पहिला जाणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.