(Ajay Sonawane) – गणेशोत्सवाला काही दिवसच बाकी आहेत. कोरोनाचे संकटामुळे यावर्षी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे लागणार असल्याने उत्सवातील जल्लोष, आनंद मिळविण्याची जनमानसांची इच्छा अपुर्णच राहणार आहे. कारखान्यात तयार करण्यात आलेल्या हजारो मुर्त्या यावर्षी विकल्या जातात की नाही या चिंतेने कारखानदार हवालदिल झाले आहेत.
पेणच्या गणेशमूर्ती महाराष्ट्र सह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. येथील मूर्तींना परदेशातूनही मोठी मागणी असते. पेण शहर आणि हमरापुर परिसरातील गावात गणपतीच्या मूर्त्यां बणविण्याचे छोटे-मोठे दोनशेच्या आसपास कारखाने आहेत. नवरात्री उत्सव संपल्यानंतर लगेच मूर्त्यां तयार करण्याचे काम सुरु होत असते. मार्च महिन्यापासूनच कोरोनाचे संकट आले. तरीही कारखानदारांनी धोका पत्करून हजारोच्या संख्येने मूर्त्या तयार केल्या आहेत. शासनाने यावर्षी मुर्तीची उंचीवर मर्यादा निश्चित करुन चार फुटापर्यंतच मुर्त्या तयार करण्याचे निर्बंध घातले आहेत. काही कारखान्यात आधीच हजारोच्या संख्येने तयार करण्यात आलेल्या मुर्त्या पडून असल्याने कारखानदारांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच आता लॉकडाऊनमूळे ग्राहकांनीही मुर्त्या खरेदीकडे पाठ फिरवलेली आहे.
नोकरीच्या मागे न धावता अनेक बेरोजगार तरुणांनी बँकांचे कर्ज काढून गणपती मूर्ती तयार करण्याचे कारखाने सुरू केले आहेत. कच्चामाल, वॉटर पॅन्ट आदी साहित्य राजस्थान, मुंबईतून मागवून हजारोंच्या संख्येने गणपतीच्या मुर्तीची निर्मिती करतात. कारखान्यांमूळे आजूबाजूच्या परिसरातील शेकडो बेरोजगार तरुणांना रोजीरोटी मिळाली आहे. पर्यावरण विभागाकडून प्लास्टरच्या मूर्तींना होत असलेला विरोध आणि सरकारने चार फुटी उंचीची घालून दिलेली मर्यादा त्यामुळे कारखानदारांचा जीव मेताकुटीस आला आहे. नफ्यात दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. आणि कमी किंमतीत मूर्तीची विक्री करावी लागत असल्याने कारखानदारा पुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.
सहकारातून उद्योग निर्मिती आणि स्वावलंबी होण्याचा प्रयोग खेडोपाड्यांत सुद्धा रुजला आहे. परस्परांच्या उत्थानासाठी अपरिहार्यतेतून गणपती मुर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू केला. बदल हा आजच्या काळाचा नवा मंत्र आहे, हा विचार आत्मसात करून भक्कम सकारात्मक आणि आश्वासक बाजू पडताळून पहात आजवर प्रामाणिकपणे व्यवसाय केला. पण आता मोठा विपत्तीचा काळ आहे. विघ्नहर्ताच यातून मार्ग दाखवील असा विश्वास मूर्तिकार नरेश गजानन ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.