“लग्न करशील माझ्याशी?”
खुप हिंमत करून रश्मीने तिच्या मित्राला – अरविंदला – विचारले..
दोघांनी एकत्र कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं होतं.. ती जॉब करायला लागली.. त्यानी पुढचं शिक्षण सुरु ठेवलं… त्याची स्वप्न खुप मोठी होती… आणि तिची स्वप्न… त्याच्या भोवती!!!
दोघे ही एकमेकांना पसंत करायचे.. पण त्याने कधी तिला जास्त भाव दिला नव्हता.. तो मित्रा प्रमाणे वागवायचा तिला… आणि तिचा तो एकुलता एक मित्र होता.. मैत्री कधी आवड बनली तिला समजलंच नाही…
पण तो ठाम होता.. लग्न आई वडिलांच्या पसंतीनेच करायचं..
ती उत्तराची वाट पाहत होती..
आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला..
” तू माझ्या साठी समुद्राच्या पाण्यासारखी आहेस… ज्यात मी मनसोक्त पोहू तर शकतो.. पण ते पाणी पिऊ शकत नाही…!!!”
त्याचा नकार तिला समजला.. पण ती तरी ही विचारात पडली… “पोहू शकतो? म्हणजे?”
तिच्या पहिल्या प्रेमाचा नकार तर तिला मिळाला.. पण तो घाव तिच्या मनावर कायम राहीला…
की एखादी व्यक्ति आपला वापर करू शकते.. आपला उपभोग घेऊ शकते.. पण आपल्याशी लग्न करू शकत नाही!!! ते ही आपल्या जवळची व्यक्ति..!
अनेक वर्ष ती एकट्यात स्वतः ला हाच प्रश्न विचारते…
आणि पुढचं प्रत्येक पाऊल टाकतान हा प्रसंग नेहमी लक्षात ठेवते..
मनावर झालेले असे काही आघात, काही घाव… माणसाला नकळत मजबूत बनवून जातात… वाईटातली वाईट परिस्थिती सुद्धा पचवण्याची ताकद देतात..
मनावरचा प्रत्येकच घाव वाईट असतो असे नाही.. तो काही तरी शिकवून जातो..
ती आज ही त्या प्रसंगा मुळे तिच्या मित्रावर नाराज नाही.. ती त्या नकारा पेक्षा ती शिकवण महत्वाची आहे.. ज्यामुळे पुढच्या आयुष्यात तिला जगणं सोप्पं झालं…
आपण ही असे किती तरी घाव हॄदयावर सोसले असतील.. पण ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच असतात.. हे नेहमी लक्षात ठेवावे…
– के. एस. अनु