चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरावा लागेल : नितीन गडकरी

nitin-gadakari

पुणे : युती सरकारच्या काळात टोल मुक्ती केली. तशी आम्ही करणार नाही. चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरावा लागेल. येत्या काळात चांगले रस्ते होतील” अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. रस्ता खराब असताना टोल का भरावा? असे नागरिक विचारात आहेत. त्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी भूमिका मांडली.

चांदणी चौकात होणार्‍या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुण्यात आले होते. यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात त्यांच्या मार्फत होणार्‍या कामांची माहिती देताना म्हणाले की, “मुबंई ते दिल्ली नवीन एक्स्प्रेस हायवे बांधत आहोत. तो 12 लेन रस्ता तयार करीत असून यामुळे 12 तासात दिल्लीमध्ये जाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

ते म्हणाले की, “संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम देखील सुरू झाले आहे. या कामास तब्बल 12 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पण या रस्त्यावर आम्ही अनेकांच्या सुचना नुसार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगातील ओव्या पालखी मार्गावर करणार आहोत. त्या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.”