पनवेल (संजय कदम) : ४० लाखांच्या सोन्याच्या दागिने लुटणाऱ्या टोळीतील फरार आरोपीला तब्बल ४ वर्षांनंतर गजाआड करण्यात गुन्हे शाखा युनिट २ पनवेलच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी मिनू ऊर्फ अलाउद्दीन नेसू मोहम्मद शेख (वय ४०) याला कोपरखैरणे येथून अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये घरफोडी व दरोडा सारखे गुन्हे करणाऱ्या टोळीमधील एक संशयित इसम कोपरखैरणे भागात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल चे साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. गायकवाड यांना प्राप्त झाली होती. सदर प्राप्त झालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे तीन टाकी चौक, कोपरखैरणे येथे सापळा रचून आरोपी मिनू उर्फ अलाउद्दीन नेसू मोहम्मद शेख (वय ४० वर्षे, रा. कमलाबाई अपार्टमेंट, घर नं.२६५, सेक्टर १९, कोपरखैरणे) यांस ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याच्या ७ ते ८ साथीदारांसह सोन्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर सी एस टी रेल्वे स्टेशन येथून पाळत ठेऊन तो इसम नेरुळ रेल्वे स्टेशन येथे उतरून एम टी एन एल ऑफिसच्या रोडवर आला तेव्हा त्याच्या डोक्यात दगड मारून त्याच्याकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग जबरीने घेऊन गेल्याचे सांगितले.
आरोपीने सांगितल्याप्रमाणे अभिलेख पहिला असता, नेरुळ पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र.४३६/२०१९ भा द वि कलम 395, 394, 34 दाखल असून त्यामध्ये ४० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने दरोडा टाकून चोरी केल्याचे समजले.
सदर गुन्ह्यात एकूण ९ आरोपी निष्पन्न झाले होते त्यापैकी ६ आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते.
सदर गुन्ह्यात यापूर्वी मोहम्मद रियासत नासिर अन्सारी (वय २५ वर्षे रा.मानखुर्द, मुंबई), खुर्शीद मोहम्मद अस्लम शेख, (वय 29 वर्षे), अल्ताफ उर्फ मेहताब अब्बास शेख (वय 39 वर्ष), अब्दुल सलीम उर्फ सोनू हकीम खान(रा. बैगनवाडी, गोवंडी, मुंबई), शरीफ असलम शेख(वय 33 वर्षे, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई), मलिक उस्मान गणी शेख (वय 38 वर्षे, रा. रफिक नगर झोपडपट्टी, गोवंडी, मुंबई) यांना अटक करण्यात आले होते. सदरची कामगिरी वपोनि रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संदीप गायकवाड, पोउपनि. मानसिंग पाटील, पोहवा सूर्यवंशी, पोहवा सचिन पवार व पोहवा पवार यांच्या पथकाने केली.