उरण/चिरनेर (सुभाष कडू) : चिरनेर – खारपाडा रोडवरील साई आर्शीया जवळ एक ते दिड फुटाहून अधिक खोलीचे खड्डे पडले असून येथील खड्डा हा रस्त्याच्या संपूर्ण भागाला खोलगड झाल्याने वाहन चालकांना या ठिकाणी वाहन चालवितांना अतिशय खबरदारी घ्यावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चोवीस तास वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरून रात्री अपरात्री जात असतांना अपघात घडत आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघातात जीवित हानी होण्याची वाट न बघता सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी वाहनचालक व पाद चाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गव्हाण फाटा ते चिरनेर आणि चिरनेर ते कर्णाळा नाका या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण, काँक्रीटकरण व रुंदीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने 2020 ते 2021 या वर्षी करोडो रुपये खर्च करून हाती घेतले आहे.परंतु चिरनेर – खारपाडा रोडवरील साई येथील आर्शीया गोदामाजवळ या रस्त्याची पावसापासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून मोठं मोठे खड्डे पडले आहेत.सदर रस्त्याचा वापर हा उरण, नवीमुंबई, मुंबई,ठाणे आणि पेण, अलिबाग,कोकण तसेच गोवा या ठिकाणी ये- जा करणारे हजारो पर्यटक, चाकरमानी करत आहेत.
त्यामुळे रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या वाहणांना सदर रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघाताची संख्या बळावली आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साई, आर्शीया गोदामा जवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट न पाहता,सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी प्रवाशांसह येथील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण मोकल यांनी केली आहे.