उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र शासनाच्या दि.११/१२/२०२० रोजीच्या शासननिर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील गावांची, वाडी वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे गावाला, वाड्या वस्तींना, विविध रस्त्यांना देण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णयानुसार उरण शहरातील बाझारपेठ जवळ असलेल्या बौद्ध बांधवांची वस्ती असलेल्या परिसराचे जातीवाचक बौद्धवाडा हे नाव बदलून नविन नाव डाँ.बाबासाहेब आंबेडकर नगर देण्याबाबत उरण बौद्धवाडा रहिवाशी संयुक्त जय भिम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष – अँड.निलेश मर्चंडे तसेच कुणाल गायकवाड, कुणाल जाधव, विजय गायकवाड, अनिकेत गायकवाड आदी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तहसिलदार उरण तसेच उरण नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांची भेट घेतली.व त्यांना तसे निवेदनही दिले.
राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांची,वाड्यांची, रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्याने राज्यात सामाजिक सलोखा निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्याच्या दृष्टीने अश्या सर्व गावांची, रस्त्यांची नावे बदलून अश्या जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबत शासनाने संबंधित प्रशासनाला आदेश दिले आहेत. या आदेशाचे, या निर्णयाचे सर्व समाजातून, सर्व स्तरातून स्वागत होत असून या निर्णया द्वारे आम्ही बौद्धवाडा हे जुने नाव बदलून नवीन नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ठेवावे अशी मागणी केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष निलेश मर्चंडे यांनी दिली.