जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत भीषण स्फोट ! मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश, १७ जखमी

fire-jindal
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत रविवारी सकाळी बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू तर, १७ कामगार जखमी झाले. मृत आणि जखमी कामगार हे परप्रांतातील असून ते कंत्राटी पद्धतीवर काम करीत होते, असे सांगण्यात आले.
कंपनीच्या एका विभागात आग लागल्याची माहिती मिळताच उर्वरित विभाग तसेच आवारात वास्तव्यास असणारे शेकडो कामगार सुखरूप बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आग विझवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अग्निशमन केंद्रे तसेच ठाणे, भिवंडी येथील अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत आग धुमसत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथे येऊन जखमींची विचारपूस केली आणि नंतर दुर्घटनास्थळाची पाहणी केली. मृतांच्या वारसांना शासकीय मदत आणि या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा त्यांनी केली.
नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव येथे जिंदाल समूहाचा पॉलीफिल्म निर्मितीचा कारखाना आहे. सुमारे सव्वाशे एकर क्षेत्रातील हा प्रकल्प विशिष्ट पॉलीफिल्म निर्मितीचे जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जातो. सकाळी दहाच्या सुमारास कारखान्यातील पॉली प्रॉडक्शन विभागात बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्याचे हादरे आसपासच्या गावांपर्यंत जाणवले. क्षणार्धात तो विभाग आगीने वेढला गेला. तेथे २० कामगार अडकले होते. सायंकाळपर्यंत १९ कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यातील दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला. जखमींपैकी चार कामगारांची प्रकृती गंभीर आहे. इतर विभागातून बाहेर पडलेल्या शेकडो कामगारांना प्रशासनाने एका शासकीय आश्रमशाळेत स्थलांतरित केले. आगीचे लोळ दूरवरूनही दिसत होते. आगीचा रौद्रावतार पाहून नाशिक महापालिका, एमआयडीसी, नगरपालिका, लष्करी छावणी मंडळ, एचएएल आणि ठाणे व भिवंडी येथून अग्निशमन दलासह बंब (फोम टेंडर) मागविण्यात आले. लष्करी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *