अलिबाग : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ( दि. 11 रोजी मुंबई येथे ) रायगड जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधरण) सन 2021-22 ची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. रायगड जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धी व स्थानिकांना रोजगार या दृष्टीकोनातून शाश्वत पर्यटन विकास करण्यासाठी मंत्रालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत 275 कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.
रायगड जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रमुख पर्यटन जिल्हा असल्याने जिल्हास्तरावरुन पर्यटन विकासाचे अनेक उपक्रम व योजना राबविण्यासाठी सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 275 कोटीं रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या बैठकीला राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चाैधरी, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यासाठी सन 2020-21 मध्ये 234 कोटी रुपये अर्थसंकल्पित करण्यात आले होते. सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये कृषी व मत्स्य व्यवसाय, शैक्षणिक सोयी सुविधा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. ह्या मागणीची दखल घेवून वित्त व नियोजन मंत्री श्री. अजित पवार यांनी 275 कोटी रुपयांच्या नियतव्ययास मान्यता दिली आहे.