अलिबाग : जिल्हा नियोजन समितीने सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी (सर्वसाधारण) 189.64 कोटी, टी.एस.पी. 32.98 कोटी, एस.सी.पी. 25.64 कोटी अशा एकूण 248 कोटी 26 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्यास काल मान्यता देण्यात आली. विकास आराखड्याचे नियोजन करताना जिल्ह्यात राबवावयाच्या विकासकामांसाठी राज्य व केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल,अशी माहिती राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित सदस्यांना दिली.
येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीस पालकमंत्री आदिती तटकरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रविशेठ पाटील, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रविंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वृषाली वाघमारे, विकास घरत, दर्शना भोईर, अमृता हरवंडकर, पद्मा पाटील, मोतीराम ठोंबरे, रीना घरत, सायली तोंडलेकर, आरती मोरे, आनंद यादव, अनूसया पादीर, सुधाकर घारे, रेखा दिसले, नम्रता कासार, राजश्री मिसाळ, मंगेश दांडेकर, बबन मनवे, किशोर जैन, चंद्रकांत कळंबे, ॲड.आस्वाद पाटील, प्रियदर्शनी पाटील, बबन चाचले, गीता जाधव, स्नेहल जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, सर्व उपजिल्हाधिकारी तसेच विविध शासकीय यंत्रणांचे कार्यालयप्रमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण व विकास कामांचा हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्हा आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध योजनांसाठी वाढीव मागणी 88.65 कोटी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरीय सभेत वित्तमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण योजनांतर्गत पुढील वर्षी रुग्णांसाठी बोट ॲम्ब्युलन्स, नैसर्गिक आपत्ती रुग्णवाहिका, मोबाईल (फिरते) डायलिसिस सेंटर, महिला व किशोरवयीन मुलींसाठी मूलभूत सोयीसुविधांचा पुरवठा या बाबी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्तीसाठी शासन निर्णयानुसार 1 लक्ष मर्यादा आहे. ही मर्यादा वाढविण्यासाठी शासनस्तरावर शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शाळा व अंगणवाड्या यांच्या दुरुस्तीसाठी सर्व आमदारांनी त्यांच्या आमदार निधीतून काही निधी वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित खासदार व आमदारांना केले.
त्याचबरोबर राज्य शासनाच्या अखत्यारीतील गड-किल्ले संवर्धनासाठी व तेथील मूलभूत सोयीसुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीचा 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येईल. या निधीतून संबंधित गड किल्ल्यांवर मूलभूत सोयीसुविधा उभारण्यात येतील, हा महत्वपूर्ण निर्णय सर्वांनुमते या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत जिल्ह्यातील तयार झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांना वीज जोडणी, निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर दुरुस्ती, शासकीय विश्रामगृह सॅनिटायईज करुन पूर्ववत सर्वांसाठी वापरायला खुले करणे, नवीन गावठाणे, वाढीव गावठाणे जिल्ह्याच्या नकाशावर आणणे, नगररचना विभागाने सुधारीत नगर रचना प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही, जुने गावठाणे व वाढीव गावठाणे याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र आढावा व मोहीम घेणे, बिगर शेती परवाना परवानगीबाबत चावडी वाचन करुन त्या संबंधीची मोहीम घेणे, नागोठणे पाणीपुरवठा योजना,अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रविशेठ पाटील, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे यांच्यासह इतर समिती सदस्यांनीही भाग घेतला.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी मंजूर निधी मार्च महिनाअखेर 100 टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश सर्व यंत्रणा प्रमुखांना दिले. त्यांनी बैठकीच्या प्रारंभी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या व्यक्तींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला तसेच विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवर व्यक्तींच्या दुखवट्याच्या ठरावाचे वाचन केले व दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
शेवटी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहू या, असे आवाहन केले.