मुंबई : आपल्या सिनेमा आणि मॉडेलिंगमध्ये व्यस्त असणाऱ्या जॅकलीन फर्नांडिसने ग्रामीण पोषण उपक्रमासाठी महाराष्ट्रातील पाथर्डी आणि सकुर ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. या उपक्रमासाठी तिने ऍक्शन अगेन्स्ट हंगर या स्वयंसेवी संघटनेबरोबर भागीदारी केली आहे.
आपल्याला शक्य असलेले सर्व प्रयत्न करण्याची तयारी जॅकलीनने दर्शवली आहे. यापूर्वीही करोनाच्या साथीच्या प्राथमिक टप्प्यामध्ये कुपोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी जॅकलीनने याच स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून काम केले होते. या प्रोजेक्टच्या माध्यमातून 1550 लोकांच्या पोषण आहाराची जबाबदारी जॅकलीन घेणार आहे.
पुढील तीन वर्षांपर्यंत तिचा हा उपक्रम सुरू राहणार आहे. जन्मानंतर मुलांच्या पोषण आहारावरही ती लक्ष केंद्रित करणार आहे. 6 वर्षांखालील मुलांच्या वाढीची तपासणीही केली जाणार आहे. याशिवाय कष्टकरी कामगारांना प्रशिक्षण आणि नोकरीसाठी मदतही आणि किचन गार्डनपण बनवण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.