दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) परीक्षांना मंगळवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ६0 टक्के विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेसाठी ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली आहे. ६६0 केंद्रांतून सहा दिवस ही परीक्षा होणार आहे.
परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की परीक्षेच्या वेळी पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंग पालन करण्यात आले होते. एनटीएचे महाव्यवस्थापक डॉ. विनीत जोशी यांनी देशभरात सर्वत्र परीक्षा शांततेत पार पडल्याचे सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक म्हणाले की विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये ही सरकारची इच्छा होती. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांच्या सहकार्याने हे शक्य झाले. त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सोयही करण्यात आली होती.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महाव्यवस्थापक डॉ. जोशी म्हणाले ६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत एक लाख १२ हजार विद्यार्थी बसणार आहेत. पहिल्या वेळी वापरलेले कॉम्प्युटर दुसऱ्या वेळी वापरण्यात आले नाहीत. त्याशिवाय परीक्षा केंद्राबाहेर पडतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची काळजी घेण्यात आली होती.