जेएसडब्लूची जलवाहिच्या दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद; नागोठण्यासह ४२ गावांत पाणीटंचाई

नागोठणे (महेश पवार) : डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्लू कंपनीच्या अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिनीची दुरूस्ती सोमवारी (दि१४) सकाळी सुरु करण्यात आली. मात्र या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी जलवाहिनीचा पाणीपुरवठा तीन दिवसांपूर्वी सोमवार पासुनच बंद करण्यात आल्याने या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या नागोठण्यासह सुमारे ४२ गावांतील नागरिकांना विशेष करुन महिलांना पाणी तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले. त्यातच जलवाहिनीच्या दुरूस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याची नागरिकांना कल्पना नसल्याने त्यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

नागोठण्यातील के.टी. बंधा-यातून डोलवी येथील जेएसडब्ल्यु कंपनीत ही जलवाहिनी नेण्यात आली आहे. नागोठणे ते डोलवी पर्यंतच्या सुमारे ४२ गावांसाठी ही जलवाहिनी सुरु ठेवण्यात आली आहे. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने ही जलवाहिनी कुठे ना कुठे वारंवार फुटल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. असे असतांनाच काही महिन्यांपुर्वी ही जलवाहिनी महामार्गावर असलेल्या निगडे गावातील नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात फुटली होती. मात्र त्यावेळी पाणीपुरवठा बंद होऊन नागरिकांची गैरसोयीचे होऊ नये यासाठी या जलवाहिनीचे काम थोड्याफार प्रमाणात करुन जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ सुरु करण्यात आला होता. आता पुन्हा निगडेसह नागोठण्यातील इंद्रप्रस्थ हाॅटेल समोर व चिकणी गावाच्या हद्दितील हाॅटेल मयूर समोर ही जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने तिच्या दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

मात्र आता या जलवाहिनीच्या संपूर्ण दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यानेच हा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे जेएसडब्ल्यु प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार निगडे येथील दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित नागोठणे व चिकणी येथील काम आज मी स्वतः उभे राहून पूर्ण करुन घेणार असल्याचे जेएसडब्ल्यु कंपनीचे संबधित विभागाचे अधिकारी मुरली नायर यांनी सांगितले. तसेच जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी नागोठणे ग्रामपंचायतीचे प्लंबरही सहकार्यासाठी पाठविण्यात आल्याचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले. दरम्यान जेएसडब्ल्यु जलवाहिनीचा पाणीपुरवठा गुरूवारी (दि.१७) पूर्ववत होईल असेही मुरली नायर यांनी स्पष्ट केले आहे.