पेण : सकाळी साडेअकराच्या सुमारास पेण-अलिबाग रस्त्यावरील वडखळनजीकच्या डोलवी येतील इस्पत कंपनीच्या चिंमण्यांमूधन अतिशय मोठ्याप्रमाणात काळेकुट्ट धुराचे लोटच्या लोट निघू लागले, शिवाय या धुराचा वास अतिशय असह्य होता. धुराच्या लोटाचे प्रमाण इतके होते की, परिसरात काही काळ काळोख पडल्यासारखे जाणवत होते. यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली होती.
जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या चिमणीमधून अचानक लाल रंगाच्या धुराचे लोळ उठल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या धूळमिश्रित धुरामुळे डोळे चुरचुरत असल्याने कंपनीमधून विषारी वायू पसरला, अशी शंका नागरिकांमध्ये होती. सुमारे २० मिनिटे चिमणीतून धुरांचे लोळ आकाशाकडे झेपावत होते. त्यामुळे परिसरामध्ये कोळोख पसरला होता. लोकांना आजूबाजूचे दिसत नव्हते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते.
डोलवी, गडब, काराव, वडखळ, आमटेम, नवेगाव, वाशीसह परिसरातील शेकडो गावांतील नागरिक लालसर रंगाचा प्रचंड धूर आणि त्याच्या उग्र वासामुळे असह्य झाले होते. जेएसडब्ल्यू कंपनीतील प्लान्ट शटडाऊन झाल्याने धुळीचे लोळ उठले होते. हा विषारी वायू नसल्याचे पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी सांगितले.
जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी नारायण बोलबुंडा यांनी म्हटले की, कंपनीमध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. सकाळी साडेअकराच्या सुमारास कंपनीच्या कोक ओव्हन प्लान्टमध्ये इलेक्ट्रिक पॉवर ट्रिप झाली. त्यामुळे कोक बनवण्याची प्रक्रिया बंद पडली आणि शटडाऊन होऊन मोठ्या प्रमाणात चिमणीमधून धुळीचे लोळ बाहेर पडले. वातावरणात पसरलेला हा धूर विषारी नाही. प्लान्ट पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.