नागोठणे (महेंद्र माने) : समस्त नागोठणेकरांची श्रद्धास्थान व आराध्य दैवत असलेली ग्रामदेवता जोगेश्वरी मातेच्या मूळस्थानी म्हणजेच नागोठणे रेल्वे स्थानकाजवळील पूर्वेकडील डोंगरात (घरळी) शुक्रवार 30 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली सत्यनारायणाची महापूजा व शांतीहोम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शहर व परिसरातील हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
सकाळी 10.00 वा. पूरोहित रामलिंग जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.लक्ष्मण ठोंबरे व सौ.सुवर्णा ठोंबरे यांच्या शुभहस्ते शांतीहोम तर श्री प्रणीत शिर्के व सौ.राखी प्रणीत शिर्के यांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. पूर्वेकडील डोंगरात जोगेश्वरी मातेच्या मूळस्थानी जाण्यासाठीचे काही अंतर हे डोंगर चढून जावे लागते. त्या ठिकाणी खडकआळीतील ग्रामस्थांनी देवीच्या मूळस्थानी जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार केला होता. तसेच संपूर्ण परिसरात जनरेटरद्वारे विद्युत रोषणाई केली होती. त्यामुळे तरुणांसह अबाल-वृद्ध व महिला भाविकांचा रात्रीच्या वेळीही देवीचे दर्शन घेण्यासाठीचा उत्साह कायम होता.
सकाळपासून नागोठणे व परिसरातील हजारो भविकांनी रात्री उशिरापर्यंत देवीचे दर्शन घेत होते.. तसेच तेथील डोंगर पठारावर महिला मंडळ, खडकआळी यांच्यावतीने हळदी कुंकु व सायंकाळी नागोठणे संत सेवा मंडळाचा हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित कराण्यात आला होता.तसेच दर्शन सोहळ्याच्या दरम्यान भाविकांसाठी खडकआळी ग्रामस्थ मंडळ व ज्वालाग्रुप यांच्याकडून तिर्थप्रसादाची व चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमासाठी खडकआळी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांनी मेहनत घेतली होती.