जोहे तलाठी गेले कुणीकडे! लोकांची खोळंबली कामे, मनसेचा आंदोलनाचा इशारा

पेण : पेण तालुक्यातील जोहे सजाचे तलाठी कार्यालयात येत नसल्याने लोकांची अनेक कामे खोळंबली आहेत. कामासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली असून रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव रूपेश पाटील यांनी पेण तहसिलदारांना या संदर्भात निवेदन दिले आहे. येथून पुढे तलाठी कार्यालयात उपस्थित न राहिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

मनसेने पेण तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने ग्रामस्थ, शेतकरी यांच्या महसुली कामकाजासाठी प्रत्येक गावात तलाठ्यांची नेमणूक केलेली आहे. या तलाठ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी दिलेल्या वारी आणि वेळेत उपस्थित राहून लोकांची कामे करणे आवश्यक असताना तलाठी सजा जोहे, हे त्यांची नियुक्ती झाल्यापासून अत्यंत कमी दिवस जोहे तलाठी कार्यालयात उपस्थित राहिलेले आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसची महामारी मार्च 2020 पासून सुरू झाली आहे, परंतु त्यापूर्वीपासून ते तलाठी कार्यालयात उपस्थित राहात नसल्याने अनेक कामे खोळंबली आहे. ग्रामस्थांनी या तलाठ्यांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येतात. तरी संबंधीत तलाठी यांना जोहे कार्यालयात दिलेल्या वारी व वेळी उपस्थित राहण्याची सक्त ताकिद देण्यात यावी.

अन्यथा ग्रामस्थाच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची नोंद घ्यावी, व त्याच्या होणार्‍या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, असे या निवेदनात मनसेने म्हटले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रायगड यांनाही देण्यात आली आहे.