टाचदुखी हा आजार मात्र वेळीच लक्ष न दिल्यास अत्यंत त्रासदायक ठरतो. बहुतांश जणांना सकाळी उठल्यानंतर हा टाचदुखीचा त्रास सुरू होतो. हळूहळू मग बसता-उठतानाही टाचांचे दुखणे वाढायला लागते. हा आजार हाडांशी संबंधित आहे. या आजारात अनेकदा घरगुती उपाय केले जातात. या आजारात काही पथ्ये-अपथ्ये पाळल्यास बराचसा आजार कमी होण्याची शक्यता असते.
काय खावे?
टाचा दुखत असताना उकळलेले गरमच पाणी प्यायल्याने निश्चित उपयोग होतो. या व्यक्तींनी गाईचे दूध घेतल्यास बरे वाटते. दह्य़ामध्ये काळी मिरी टाकून दिवसा त्याचे सेवन करावे. ताकात आले, ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो. गहू, ज्वारी, तांबडी साल असलेला हातसडीच्या तांदळाचा आहारात समावेश करावा. स्थूल व्यक्तींना टाच दुखण्याचा त्रास होत असल्यास आहारात नाचणीचे पदार्थ खावेत. तिळाचे विविध पदार्थही टाचदुखी कमी करण्यास मदत करतात. म्हणून तिळाची चटणी नियमित आहारात घ्यावी, त्यामध्ये खोबरेल तेल वा गोडे तेल घालून घेतल्यास उत्तम! जेवणात मूग आणि कुळाचा वापर अधिक प्रमाणात करावा. लसूण घालून फोडणी कुळाची पिठी ही उपयोगी ठरते. या आजारात मधाचाही वापर करणे गुणकारी असते. हिरडय़ाच्या झाडावरील मध अधिक चांगली असून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास आराम पडतो. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते. कोबी, भेंडी, पडवळ, सुरण, तोंडली या फळभाज्या या आजारात खाव्यात. चिंच, लिंबू, कोकम यांचाही वापर करायला हरकत नाही. बोरं, पेरू, डाळिंब, खजूर या फळांचे सेवन गुणकारी ठरते. विश्रांती घेणे यावरील उत्तम उपाय आहे. तेलाचा अभ्यंग, शेक याने बरे वाटत असले तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार करणे योग्य असते.
टाचदुखी असताना आले, हळद, लसूण, कांदा आणि ओवा यांचे आहारातील प्रमाण अधिक ठेवावे. सलाडमधील मुळा आणि गाजर याचेच सेवन करावे. इतर पदार्थ शक्यतो टाळावेत. विशेषत: काकडी व टोमॅटो. स्थूल व्यक्तींनी टाच दुखत असताना गोड पदार्थ खाणे पूर्णत: बंद करावे. रात्री झोपताना नियमितपणे टाचांना एरंड तेल लावावे. एरंड तेलामध्ये गोमूत्र टाकून त्याचे सेवन केल्यास आराम पडतो. एरंड तेल पोळीमध्ये घालून खाल्ल्यासही फायदा होतो. मोहरीचासुद्धा अधिक वापर करायला हरकत नाही.
अपथ्ये
टाच दुखत असतांना थंड पाण्यात पोहणे व थंड पाण्यात पाय सोडून बसणे पूर्णत: टाळावे. थंड पाण्याने आंघोळसुद्धा शक्यतो करू नये. टाचा दुखण्याचा त्रास असताना रताळी, साबुदाणा, बटाटय़ाचे पदार्थ इत्यादी स्निग्ध गुणांचे पदार्थ आहारातून वर्ज करावे. या पदार्थाच्या सेवनाने त्रास वाढण्याची शक्यता असते. विविध प्रकारचे डबाबंद पदार्थ, शीतपेयांचे सेवन करू नये. बर्फ घालून केलेले मिल्कशेक किंवा तत्सम पेय टाच दुखणाऱ्या व्यक्तींनी टाळलेलेच उत्तम. सुपारी-तंबाखूचे व्यसन सोडल्यास अधिक फायदा होतो. विशेषत: स्त्रियांनी मशेरी म्हणजेच तंबाखूने दात घासू नयेत. यामुळे टाचांचे दुखणे वाढतेच, सोबत वाताचा त्रासही वाढतो. भाज्यांमध्ये उसळ आणि चवळी, पांढरे वाटाणे, कडवे वाल, मटकी यांचे सेवन न केलेल्या उत्तम. मांसाहारी व्यक्तींनी वाळवलेले मांस किंवा सुके मासे तसेच साठवून ठेवलेले मांस किंवा मांसाचे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत. आंबवलेले पदार्थ टाळायला हवेत. तुरट रसाची व आंबट रसाची फळे किंवा इतर पदार्थ खाणे अहितकारक असते. मधुमेही रुग्णांनी जांभूळ व त्याचे इतर पदार्थ टाचेचा त्रास असताना खाऊ नये. नासवून केलेले दुधाचे पदार्थ वज्र्य करावेत. ढोकळा, शेव, फरसाण, भेळ, चाट खाणे कमी केल्यास फायदा होतो. अतितिखट खाऊ नये. टाचदुखी असताना थंड हवेत झोपणे टाळावे. रात्री झोपताना अति थंड पाणी प्यायल्यास टाचदुखी वाढते. जड चपला, मोजे न घालता बूट घालणे, अतिरिक्त उंच चपला टाचदुखी वाढवतात. टाचदुखी ही स्थूल व्यक्तींनाच होते असा गैरसमज आहे. स्थूल व्यक्तींना याचा अधिक त्रास होत असला तरी वेळीच योग्य पथ्य केल्यास याच्या त्रासातून मुक्त होता येते