अलिबाग : ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आगरी सामाजिक संस्था अलिबाग आयोजित चिंगी हे नाटक ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सुरू झाले. अन उत्तरोत्तर रंगत गेले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रकाश पाटील यांनी लेखक, दिग्दर्शक, कलावंत अशी तिहेरी जबाबदारी खांद्यावर घेऊन नाटक यशस्वीपणे पेललेले दिसलें. नाटक सादर करणे अन् ते पण राज्यनाट्यस्पर्धेत ! अवघड गोष्ट आहे, पण ते शक्य करून दाखवले.व शिवधनुष्य प्रकाश पाटील यांनी यशस्वीपणे पेलले. या नाटकात आठरा पात्रांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक पात्राचे स्वभाव,वर्तन भिन्न असल्याने नाटक अभिरुची पूर्ण व मनोवेधक बनले.
चिंगी नाटकात चार स्त्रीपात्र आहेत. चौघींनी पण उत्कृष्ट भूमिका साकारुन नाटकाला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवले. नाटकात त्यांचे कचा कचा भांडणे हे जसे स्वाभाविक वाटले तसेच शेजारधधर्म कसा निभवावा हा त्यांनी नाटकाच्या मंचावरुन दिलेला धडा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरला आहे.दिपाली म्हात्रेंनी सादर केलेली सुंदरा खूपच उठावदार बनली तर, डॉ.पल्लवी पाटील यांनी चितारलेली हौसा नाटकात भाव खाऊन गेली. बालकलाकार कु.स्वरा ही चिंगी ,तर कु.मैथिली ही परी म्हणुन साजेशी वाटली.
अंधश्रद्धेचे भूत गाडायलाच पाहिजे ! असा संदेश या नाटकाच्या माध्यमातून समाजाला मिळतो.बुवा,बाबा कसे ढोंगी व निर्दय असतात. हे आपणास या नाटकाच्या माध्यमातून कळते. नाटकातील पुरुष पात्र चौदा जण असले तरी प्रत्येकाची भूमिका मनात ठसते. रसिकांना तीन तास खिळवून ठेवणारे हे दोन अंकी नाटक समाजाचे प्रबोधन करते.दोन तरुणांची मजेशीर वाटणारी जोडी आदिल व हर्षल यांनी इंद्र्या व हनम्या साकारुन नाटकाच्या अधेमध्ये हास्याची लकेर उमटवली. तर सावत्या नावाचे साधेसुधे वाटणारे जाडजुड पात्र प्रसाद लोध यांनी अभिनयाचे उत्तुंग शिखर गाठून साकारले. नंदकुमार पाटील यांनी बाळ्या नावाचे पात्र उभे करतांना अभिनयाची चौफेर उधळण करुन रसिकांकडुन उस्फूर्तपणे वाहवा मिळवली.
अजित नार्वेकर यांनी भगताचे रोल रोल ताकदीने सांभाळले. तर गायक बुवा म्हणून केलेली प्रकाश पाटील यांची भूमिका मनोवेधक ठरली. विजय पाटील यांनी रंगवलेला इन्स्पेक्टर स्मरणात राहतो. जयवंत ठाकुर यांचे संगीत मधुर व आकर्षक वाटले.विनीत पाटील,आडिवरेककर,सागर पाटील यांचे नेपथ्य वास्तववादी व नाटकाला साजेसे असे होते. या नाटकातील राजेंद्र पांचाळ यांची प्रकाशयोजना फारच कल्पक वाटली.एकंदरीत नाटक मस्त !!
नाटकासाठी रसिक प्रेक्षक म्हणून अग्रसेन मासिकाचे कार्यकारी संपादक नरेंद्र म्हात्रे, अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचे अध्यक्ष कैलास पिंगळे, सचिव महादेव म्हात्रे, आगरी सामाजिक संस्था अलिबागचे कार्याध्यक्ष जगदीश थळे, कवी पि.के.म्हात्रे, राष्ट्रफतीपदकविजेते रवी पाटील असे अनेक मान्यवर ठाणे इथे डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपस्थित होते.