पेण : दि (प्रतिनिधी) पेण तालुक्यातील कळवे गावातील लिलाधर आत्माराम पाटील या माध्यमिक शिक्षकाची सुकन्या डॉक्टर सुविधा पाटील यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेतली असून स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी त्यांना ” कोरोना योध्दा ” पुरस्कार देवून सन्मानीत केले आहे.
मुंबईतील आयुर्वेद महाविद्यालय सायन येथे साडेचार वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करुन वैद्यकीय क्षेत्रातील बी. ए. एम. एस. ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केली. तद्नंतर खाजगी सेवा न करता सरकारी क्षेत्रातून गोरगरीब, सामान्य रुग्णांची सेवा करण्याचे ठरविले. अनुभवाची जोड असावी म्हणून काही काळ त्यांनी पनवेल येथील नामांकित प्राचीन हॉस्पिटलमध्ये तज्ञ, अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यानंतर त्यांची रायगड जिल्ह्यातील पाली येथे महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन डॉ. सुविधा पाटील यांनी मुंबईत हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी – प्रभादेवी याठिकाणी पोद्दार कॉलेज कोव्हिड सेंटर येथे सेवा करण्याचे ठरविले. आणि आजच्या घडीला वरळी झोन बहुतांशी नियंत्रणात आले आहे. तिथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय टीमचे देशपातळीवर कौतुक होत आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या बरोबरीने डॉ. सुविधा पाटील यांचेही योगदान तितकेच महत्वपूर्ण ठरलेले आहे.
मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि महानगरपालिका वरळी विभागाचे उपायुक्त शरद उघडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी डॉ. सुविधा पाटील यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला आहे. महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर या महापालिकेच्या आरोग्य विभागात सेवेत होत्या. योगायोगाने त्यांच्याच हस्ते डॉ. सुविधा पाटील यांचा सत्कार ही उल्लेखनीय बाब ठरली आहे.
डॉ.सुविधा पाटील यांनी अल्पावधीतच केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॕड. पी.डी. पाटील, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अॕड.निलिमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोदशेठ पाटील, सार्वजनिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आगरी समाज बांधवांनी कौतुक व अभिनंदन केले आहे