डोंबिवलीच्या ‘या’ पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

raj-thakare

नवी मुंबई : डोंबिवलीमध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठे खिंडार पडले आहे. कारण, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवलीचे शहाराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत राहिलेले राजेश कदम यांनी प्रवेश केल्यामुळे मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेश कदम यांच्यासोबतच अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे हे सर्व पदाधिकारी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण या मतदारसंघातील असल्याचे समजत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बालेकिल्ल्यातच खिंडार पाडल्याने, आता यावर मनसेकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये मनविसेचे सागर जेधे, डोंबिवली शहर संघटक दीपक भोसले, प्रदेश उपाध्यक्ष राहुल गणपुले, शहर सचिव कौस्तुभ फकडे, मनविसे शहर संघटक सचिन कस्तुर आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.