तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने खळबळ

pistal

अंबरनाथ : नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून या यादीमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचा आरोप सर्वच पक्ष करीत आहे. त्यातच रिपाइंचे माजी शहराध्यक्ष अजय जाधव यांनी थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ नगरपालिकेची मतदार यादी तयार करण्यासाठी विधानसभेच्या भाग क्रमांकाप्रमाणे यादी फोडून मतदारांचा प्रभाग निहाय समावेश करण्यात आला आहे. मात्र हे करताना संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत आणि यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदारांना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतर केल्याचे समोर आले आहे.

या सोबतच विधानसभेच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याने त्याचाही त्रास राजकीय पक्षांना होत आहे. बोगस नावे पालिका निवडणुकीत काढणे शक्य नसल्याने त्याच आधारावर निवडणुका घेतल्या जाणार असल्याने सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करीत बोगस मतदारांसंदर्भात आपला आक्षेप नोंदवत आहेत. एवढेच नव्हे तर अनेक मतदार याद्या तयार करताना एका प्रभागातील नावे थेट दुसऱ्या प्रभागात टाकून संबंधित कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे.

पालिकेची यादी तयार करताना कर्मचाऱ्यांच्या चुकीचा भुर्दंड हा थेट निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बसणार असल्याने आता इच्छुक उमेदवार आपापल्या स्तरावर संताप व्यक्त करत आहेत. थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

अजय जाधव यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. पुढील कारवाई पोलीस प्रशासनामार्फत केली जाईल.
– जयराज देशमुख, तहसीलदार