तुटवलीतील उद्योजक विनोदराव मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश : खा.सुनील तटकरे यांच्याहस्ते सुतारवाडी येथे स्वागत

पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील प्रसिध्द हॉटेल व्यावसायिक आणि विविध राजकीय पक्षांची प्रमुख पदे भूषविणारे तुटवली येथील उद्योजक विनोदराव मोरे यांनी सुतारवाडी येथे खा.सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला.

पोलादपूर तालुक्यातील तुटवली गावामध्ये अलिकडेच विनोदराव मोरे यांनी केलेला यज्ञ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. याखेरिज पोलादपूर, माणगांव आणि महाड तालुक्यातील हॉटेल व्यवसायासोबतच त्यांनी महिला वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी सौंदर्यवती स्पर्धा आणि नृत्य स्पर्धांच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण भुमिका बजावून अनेक महिलांमध्ये जगामध्ये वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याकामी प्रयत्न केले आहेत.

पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रीय राहिलेले विनोदराव मोरे यांनी जनहित लोकशाही पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपद भूषविले होते. अलिकडेच, जनहित लोकशाही पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व कार्यकारिणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहण्याचे आदेश दिले होते.

रविवारी विनोदराव मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वाय.सी.जाधव, महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडीक, विधानसभा उपाध्यक्ष सुहास मोरे, माजी अध्यक्ष कृष्णा करंजे, माजी उपसभापती संभाजीदादा साळुंखे, अल्पसंख्यांक तालुकाअध्यक्ष महमद मुजावर, बारकू शिंदे, निवृत्ती महाडीक यांच्यासमवेत जाऊन जाहिररित्या प्रवेश केला. याप्रसंगी रायगडचे खा.सुनील तटकरे यांनी विनोदराव मोरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.