पोलादपूर (शैलेश पालकर) : तालुक्यातील तुर्भे भागातील आणि मतदारसंघातील सर्व विकासकामे आ.भरतशेठ आणि बाळासाहेबांची शिवसेनाच करणार असून मुंबईवरून येथे विकास कामे करण्यासाठी कोणीही येणार नाही, असा दावा महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते-पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनी केला.
आ.गोगावले यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या 3 कोटी 50 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ सोमवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी तुर्भे बुद्रुक तुर्भे खोंडा नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक शिवाजी चौक ते तुर्भे खोंडा रस्ता भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक शेलारवाडी रस्ता भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक सभा मंडपाचे भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक बौध्दवाडी संरक्षण भिंत भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक गावठाण रस्ता भूमिपूजन, तुर्भे बुद्रुक मंगेश गोळे यांच्या घराजवळील साकवाचे भूमिपूजन, तुर्भे स्मशानभूमी संरक्षण भिंत उद्धाटन इत्यादी विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे तसेच दशरथ उतेकर, संदेश कदम, सरपंच, उपसरपंच,इत्यादी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भगिनी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी आ.गोगावले यांनी, तुम्ही जे जे सांगितले ते आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला. पण या पंचक्रोशीतील काही लोकांनी किती शब्द पाळला, याचे आत्मपरीक्षण करा. आज कोटयवधी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ तुर्भे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला-भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे आणि आपण पुढेही जे जे सांगाल ते आपण करणार आहोत.
इथे विकास कामे करण्यासाठी मुंबईवरून कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला ज्या ज्या वेळेस अडचण भासेल. त्यावेळेस ही स्टेजवर बसलेली मंडळीच लागेल ते सहकार्य करेल. तुमची सर्व विकास कामे आम्ही करत आहोत तुमच्या अडीअडचणीला सामोरे जात आहोत. मग तुम्हाला आणखी काय पाहिजे, आम्ही काहीही चुकीचे करत नाही करणार नाही. अशी ग्वाही दिली.
आम्ही बाळासाहेबांचा वारसा जपण्याचा जोपासण्याचा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करीत आहोत, असे आ.गोगावले यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.