पोलादपूर (शैलेश पालकर) : पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी गावालगतच्या चौपदरीकरणादरम्यान डोंगरातून मोठया प्रमाणात दरडी कोसळून महामार्ग ठप्प झाला आणि महामार्गालगच्या शेतजमिनी तसेच घरांनाही धोका निर्माण झाला. धामणदिवी गावाच्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनेकडे राज्यसरकारने दूर्लक्ष करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त करीत रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा प्रशासनाचे घटनेच्या गांभिर्याकडे लक्ष वेधले.
पोलादपूर तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर धामणदिवी गावालगत डोंगरातून दरडी कोसळून 9 आणि 10 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. या दरडी हटविताना शेतकऱ्यांच्या शेतात दगड मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनीचे मोठे नुकसान झाले.यासंदर्भात, स्थानिक महिला कार्यकर्ती क्षमता राजेश बांद्रे यांनी 25 जुलै 2020 रोजी खा.सुनील तटकरे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान निवेदन देऊन शेतजमिनीची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी दरडी कोसळण्याच्या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गालगतच्या घरांनाही दरडीखाली चिरडण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे मतही व्यक्त झाल्यानुसार या परिसराचे भूवैज्ञानिकांद्वारे सर्वेक्षण करून दरडप्रवण क्षेत्रातून ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यासंदर्भात खा.तटकरे यांनी आदेश दिले. यावेळी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बामणे, एलऍण्डटीचे अभियंता बांगर यांनी अनुकूलता दर्शविली.
मात्र, या काळात प्रशासकीय बदल्यांचे पेव फुटल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बामणे व महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची बदली होऊन धामणदिवीचा प्रश्न रखडला. परिणामी, शेतामध्ये दरडी टाकून नापीक जमिन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही तसेच दरडप्रवण क्षेत्रातील महामार्गालगतच्या घरांचे भूसंपादन करून स्थलांतर करण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. यापार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्ती सौ. क्षमता राजेश बांद्रे यांनी तब्बल 1 महिन्यानंतर पुन्हा रायगड लोकसभा मतदार संघाचे खा.सुनील तटकरे यांना निवेदन देत धामणदेवीतील दरडीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आणि दरडप्रवण क्षेत्रातील घरांचे चौपदरीकरणामध्ये भूसंपादन करून अन्यत्र पुनर्वसन करण्याची मागणी या निवेदनामध्ये केली.
यावेळी खा.सुनील तटकरे यांनी राज्यात माळीण, कोंडीवते, जुई,रोहन सारख्या दरडी कोसळण्याच्या दूर्घटनांमध्ये अनेकांचे हकनाक बळी गेल्याच्या घटना झाल्या असताना धामणदिवी येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतचा डोंगर कोसळून निसर्गाने धोक्याचा इशारा दिला असूनही या घटनेचे गांभिर्य राज्यसरकारच्या निदर्शनास आणून दिले नाही, ही बाब अयोग्य असल्याचे सांगून महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आणि राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बामणे यांना तातडीने पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात तीव्र शब्दांत आदेश दिले.
पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी येथे गेल्या महिन्यात दरड कोसळून शेतीचे नुकसान होत महामार्गालगतच्या घरांना निर्माण झालेल्या धोक्याकडे तब्बल महिनाभरानेही दूर्लक्ष झाल्याबद्दल स्थानिक महिला कार्यकर्ती क्षमता बांद्रे आणि राजेश बांद्रे यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना गुरूवारी निवेदन दिले.