दापोली : दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागात मंगळवारी पहाटे साडेपाचपर्यंत १०.२ इतके नीचांकी तापमान नोंदविले गेले तर बुधवारि सकाळी १० अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. थंडीच्या या हंगामातील या सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली.
आठवडाभरात कमी तापमानाची नोंद होत होती. साधारण तापमान १५ ते १६ अंश सेल्सिएसच्या दरम्यान होते. मात्र काल (ता. ९) मध्यरात्रीनंतर तापमान घसरले. असले तरी काल रात्री दापोली शहर व परिसरात थंडीचा एवढा परिणाम जाणवला नसल्याने दापोलीकरांना हुडहुडी भरण्याएवढी थंडी जाणवली नाही. शहर व परिसरातील नित्य व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. आज दिवसभरात तापमान वाढलेले होते.
जिल्ह्यात यावर्षी परतीचा पाऊस लांबला. साधारणपणे ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबरच्या प्रारंभास जिल्ह्यात थंडीला प्रारंभ होतो. यंदा नोव्हेंबरमध्ये एक-दोन दिवसच थंडीची 10 चाहूल लागली. मात्र, त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली नोव्हेंबरच्या अखेरीस पुन्हा दोन-चार दिवस थंडी पडली.
परंतु मंदौस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरण होऊन थंडी कमी झाली. त्यानंतर थंडीत सतत चढउतार होते. सोमवारी (ता. ९) सायंकाळपासून जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले. आतापर्यंत गुंडाळून ठेवलेले स्वेटर्स लोकांनी बाहेर काढले. जागोजागी शेकोट्या पुन्हा एकदा पेटल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या वर्षातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद आज झाली असून, हे तापमान १०.२ अंश सेल्सियस इतके होते तर सलग दुसऱ्या दिवशी १० अंश होते.