पनवेल (संजय कदम) : खारघर शहरात दारू विक्रीची परवानगी दिल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दारूविक्रीला कडाडून विरोध करण्यासाठी आज खारघर शहर बंद ठेवून नागरिक आणि राजकीय पक्षांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
गेल्या २० वर्षापासून खारघर शहराची शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख बनू लागली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून शहरात सुरू झालेल्या निरसुख पॅलेस बारमुळे याला धक्का बसला आहे. आता खारघर शहरात तीन बार सुरू झाले आहेत. त्यामुळे दारू विक्रीचे परवाने बंद करावे, अशी मागणी माजी नगरसेविका लीना गरड यांनी केली आहे. यावेळी निरसुख पॅलेसची बारची परवानगी रद्द करावी, अशी मागणी यावेळी आंदोलक व नागरिकांनी केली. या बंदमध्ये व्यापारी, रिक्षाचालक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी आंदोलकांनी दारूमुक्तीच्या घोषणा दिल्या. खारघर शहर गेल्या १५ वर्षांपासून नो लिकर झोन म्हणून ओळखला जात आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांत एका बारला परवानगी मिळाली आहे. त्या मुळे खारघर शहराच्या दारूमुक्तीला धक्का बसला आहे. त्यामुळे दारू विक्रीची परवानगी मिळालेल्या हॉटेलचा परवाना रद्द करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.