पनवेल : माथेरान येथील दिवंगत पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल रामशेठ ठाकूर यांचे पत्रकारांनी आभार मानले. यावेळी संतोष पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार यांचे कोरोनाने निधन झाले. सतत हसतमुख आणि लोकांच्या मदतीला धावणारे संतोष पवार यांच्या अकस्मात निधनाने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व्यक्तींना धक्काच बसला त्यांच्या निधनाने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जेष्ठ पत्रकार गणेश कोळी, पत्रकार कुणाल लोंढे, वैभव गायकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे, पत्रकार विजय पवार, भालचंद्र जुमलेदार, सुमंत नलावडे, अनिल कुरघोडे, नितीन देशमुख, लक्ष्मण ठाकूर, अविनाश जगधने यांनी भेट घेऊन सर्व पत्रकारांच्यावतीने संतोष पवार यांच्या कुटुंबाना केलेल्या आर्थिक मदतीबद्दल रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर यांनी, संतोष पवार हा अतिशय चांगला पत्रकार होता धावता-बोलता पत्रकार, समाजाची प्रगती कशी होईल याचा विचार करणारा पत्रकार होता. त्याच्यामध्ये फार मोठे विचार होते, माणुसकी होती, भावणारा पत्रकार होता. आज कोरोनाने जगावर संकट आले. हे संकट फार मोठे आहे. कोरोनामुळे जगाची दमछाक झाली आहे, म्हणून या आलेल्या संकटाशी पत्रकारांनी सामना केला पाहिजे असे रामशेठ ठाकूर यांनी सांगितलें.
रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय पवार यांनी,संतोष पवार यांचे निघून जाणे हे सगळ्यांना धक्का देऊन गेले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोष पवार यांच्या कुटुंबाना जी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व पत्रकारांच्यावतीने आभार मानतो, असेच सदैव रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांच्या पाठीशी रहावे अशा अपेक्षा विजय पवार यांनी व्यक्त केल्या.