पेण (गणेश म्हात्रे ) : उरण तालुक्यात असलेल्या द्रोणागिरी किल्ल्याचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने दुर्ग मावळा प्रतिष्ठान या गड किल्ल्याचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमी संघटनेच्या विद्यमाने येत्या रविवारी सकाळी ८ वाजता उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम आखण्यात आली आहे.
अतिवृष्टी, वादळवाऱ्यामूळे द्रोणागिरी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होते, दगड व माती कोसळून गडावर जाणारा मार्ग खुपच खडतर होत असल्याने किल्ल्यावर ये-जा करणाऱ्या दुर्ग पर्यटकांना कोणत्याही प्रकारे दुखापत होऊ नये यासाठी पायथ्या पासून ते माथ्या पर्यंत जाणारा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे. गडावर वाटेतील पडलेली झाडे बाजूला काढणे, वाटेतील पडलेले दगड- धोंडे बाजूला काढणे, गडावर जाणारी पायवाट नव्याने करणे आणि नादुरुस्त झालेल्या पायऱ्या दुरुस्त करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
गड प्रेमीं उरण एस.टी डेपो ,डाऊरनगर, उरण शहर ( जि. रायगड ) येथे सकाळी आठ वाजता एकत्र जमून पुढे निघणार आहेत. प्रवास खर्च वैयक्तिक असणार असून इच्छुकांनी सोबत शिदोरी आणावी असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे विभाग प्रमुख चेतन गावंड यांनी केले आहे.
गड स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आधिक माहिती साठी चेतन गावंड ९८१९७५९१०५, गणेश तांडेल ९५९४४७६०५०, चंद्रशेखर भोमकर ९९२०१३००९९, रवींद्र भोईर ९३७२९५१९४९ यांच्याशी संपर्क साधावा.