पुणे : देहविक्रय करणाऱ्या बुधवार पेठेतील ९९ टक्के महिलांना कोरोना साथीमुळे आलेल्या मंदीत संधी मिळाली तर पर्यायी व्यवसाय, रोजगार करण्याची इच्छा आहे,असे ‘आशा केअर ट्रस्ट’ या संस्थेच्या सर्वेक्षणात आढळले आहे.
लॉकडाऊनमुळे देहविक्री करणाऱ्या व्यवसायातील ८५ टक्के महिलांनी मालक, व्यवस्थापक आणि सावकारांकडून कर्ज घेतले आहे.मात्र आता ग्राहकच नसल्याने ते फेडायचे कसे, हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.त्यामुळे बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्यांपैकी ९९ टक्के स्त्रिया उपजीविकेसाठी पर्यायांचा शोध घेऊ लागल्या आहेत.
‘आशा केअर ट्रस्ट’ या देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी कार्यरत संस्थेच्या पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
या संस्थेने केलेले सर्वेक्षण महापौर मुरलीधर मोहोळ यांना सादर करण्यात आले.आणि आवश्यक पावले उचलण्याची विनंति करण्यात आली . ‘आशा केअर ट्रस्ट’ चे हे सर्वेक्षण महत्वपूर्ण आहे. मानवी दृष्टीकोणातून या समस्यांकडे पाहिले पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधून या समस्यांमध्ये कोणते मार्ग काढता येतील ते पाहू’, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या शिष्टमंडळाला सांगीतले.
‘आशा केअर ट्रस्ट ‘च्या शिष्टमंडळात ट्रस्टच्या अध्यक्ष शीला शेट्टी, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे शैलेश बढाई,महाराष्ट्र इंटक कामगार संघटनेचे योगेश भोकरे,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे फय्याज शेख, भोला वांजळे,एड. विद्या पेडणेकर यांचा समावेश होता.
बुधवार पेठ ही पुण्यातली सर्वात मोठी तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची वसाहत आहे. या भागात सुमारे सातशे कुंटणखाने आणि जवळपास ३ हजार देहविक्रेत्या स्त्रिया असल्याचे सांगितले जाते. यातल्या तीनशे स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. यातल्या ८७ टक्के महिलांनी सांगितले की, कोरोनाची साथ येण्यापूर्वीही त्यांना देहविक्रयातून कुटुंबाचे पालनपोषण करण्याइतपतही उत्पन्न मिळत नव्हते. मात्र शिक्षणाचा अभाव,रोजगाराच्या कौशल्यांची उणीव आणि परतीचे मार्ग खुंटल्यामुळे त्यांना या नरकात खितपत पडावे लागले. कोरोनाच्या साथीनंतर मूळच्याच तुटपुंज्या उत्पन्नातही मोठी घट झाली. त्यामुळे आता अवस्था बिकट झाली आहे. त्यातूनच कर्जाचे ओझे वाढले आहे. परिणामी बहुतेक सर्वच स्त्रियांना पर्यायी काम-व्यवसायाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आहे. या महिलांपैकी ८२ टक्के महिला २५ ते ४५ या वयोगटातील आहेत. ८४ टक्के महिला अशिक्षित आहेत. त्यातील १६ टक्के मुलींना शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच ते सोडून या व्यवसायात ढकलले गेले.
८४ टक्के महिलांना या परिस्थितीत देहविक्रय करण्याची भीती वाटते. मात्र,कुंटणखाना चालकांकडून येणाऱ्या दबावामुळे आणि उपजीविकेच्या प्रश्नामुळे पर्याय राहत नाही. ६८ टक्के महिलांना वाटते कि व्यवसाय पुन्हा तग धरेल. संधी मिळाली तर पर्यायी काम करण्याची ९९ टक्के महिलांची तयारी आहे.
आशा केअर ट्रस्ट च्या अध्यक्ष शीला शेट्टी म्हणाल्या, ‘कोरोना विषाणू साथीमुळे देहविक्रय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन करण्याची संधी आहे. ज्या महिलांना नाईलाजाने हा व्यवसाय निवडावा लागलेला आहे, ज्या महिला जबरदस्तीने या व्यवसायात ढकलल्या गेल्या आहेत, त्यांना कर्जाच्या सापळ्यातून मुक्त करण्यासाठी ट्रॅफिकिंग व्हिक्टीम रिलीफ फंड दिला गेला पाहिजे. आणि आयुष्याची नवी दिशा दाखवली पाहिजे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या समस्या सोडवणुकीसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हा प्रशासनही आवश्यक पावले उचलेल अशी आशा आहे’
राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन अंतर्गत महिलांसाठी टेलरिंग, डाटा एन्ट्री, टेलिकॉलिंग विक्री व विपणन, पॅकेजिंग, उद्योजकता आदी व्यावसायिक कौशल्यांवर आधारित मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम देहविक्रेत्या स्त्रियांसाठी राबविता येतील, असे अहवालात सूचित करण्यात आले आहे.
याच महिलांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या’फ्रिडम’ संस्थेच्या म्हणण्यानुसार देहविक्रय व्यवसायातील या महिलांना आधीपासून अनेक यातनांना सामोरे जावे लागत आहे, त्यांना पर्यायी पुनर्वसनाची संधी दिली पाहिजे. सामाजिक संस्था आणि सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. कोविडमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था राज्य सरकारकडेही हे प्रश्न मांडणार आहेत.