धक्कादायक! कावीरचे उपसरपंच प्रविण कदम यांचे निधन

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते कावीर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रवीण भास्कर कदम यांचे बुधवारी दि 19 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. त्यांच्या धक्कादायक निधनाने शेकापक्षासह तालुक्यातील संपूर्ण राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा वर्तुळात मोठा धक्का बसला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आज सायंकाळी ते आपल्या साईट वरून गरुडपाडा येथील घरी आल्यानंतर रात्री 8 च्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत जोरदार कळ आली. काही कळण्याच्या पूर्वीच आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.  राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रवीण कदम यांच्या अचानक जाण्याने तालुक्यात मोठा हादरा बसला आहे.

कावीर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच होते. अलिबाग तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष, बामणगाव कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष असे विविध पदांवर ते सक्रिय हिरीरीने काम करत होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार गुरुवार दि 20 रोजी करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच शेकापक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.